लय भारी ! सौर ऊर्जेमुळे वीज बिलांमधून सुटका; शिल्लक विजेतून उत्पन्नही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 07:03 PM2021-11-17T19:03:58+5:302021-11-17T19:05:55+5:30
केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्तसाहाय्य देण्यात येत आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात अडीच हजार घरांच्या छतावर सौर ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती केली जात आहे. वीज बिलाची तर बचत होतेच, शिवाय या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून शिल्लक वीज महावितरणकडून विकत घेतली जात आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना वेग देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्तसाहाय्य देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.महावितरणकडून लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षाअखेर सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून शिल्लक वीज महावितरणकडून विकत घेतली जात आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधित घरगुती ग्राहकांना होत आहे. महावितरणने रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडळनिहाय एजन्सींची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शहरातील सौर ऊर्जा वापरणारे ग्राहक
-लघुदाब : २,७०४ : १८ हजार ५०९ किलोवॅट क्षमता
- उच्चदाब : ६८ : १६ हजार ८७३ किलोवॅट क्षमता
सौर ऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढते
शहरात सौर ऊर्जेचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. जागेची पाहणी करून योग्यता पाहून त्यासाठी परवानगी दिली जाते. सौर ऊर्जा ही ग्रीन एनर्जी असून नागरिकांनी त्याचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी योजनाही आहेत.
- सतीश खाकसे, कार्यकारी अभियंता, शहर मंडळ, महावितरण