‘समृद्ध कवीच समृद्ध गझल लिहू शकतो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:24 AM2018-08-14T01:24:12+5:302018-08-14T01:25:38+5:30
गझल आता मराठीत लिहू लागलेली आहे आणि समृद्ध कवीच समृद्ध गझल लिहू शकतो. मध्यंतरी मुक्तछंदाचं पीक आलं होतं. पण आता गझल पुन्हा पकड घेऊ लागलेली आहे, असे प्रतिपादन आज येथे प्रख्यात मराठी गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गझल आता मराठीत लिहू लागलेली आहे आणि समृद्ध कवीच समृद्ध गझल लिहू शकतो. मध्यंतरी मुक्तछंदाचं पीक आलं होतं. पण आता गझल पुन्हा पकड घेऊ लागलेली आहे, असे प्रतिपादन आज येथे प्रख्यात मराठी गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी केले.
औरंगपुऱ्यातील गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात आयोजित मराठी गझल संमेलनाचे सायंकाळी ते उद्घाटन करताना बोलत होते. ध्यास गझल साहित्य समूह, अभ्युदय फाऊंडेशन व स. भु. कला, वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी, मराठी गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
‘माणसाला एक वाली पाहिजे
आणि त्याची भेट झाली पाहिजे
खायला मिळाले नाही तर चालते
फक्त आपुलकी मिळाली पाहिजे
व्हायला क्रांती नवी या जगी
एकदा ठिणगी उडाली पाहिजे’
अशा ओळी सादर करून डॉ. मिन्ने यांना उपस्थितांची प्रशंसा मिळाली.
गोष्ट खाण्याची असो की गाण्याची. आस्वाद घेता आला पाहिजे, असे मत दुसºया उद्घाटक उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले. पुण्याचे मराठी गझलकार भूषण कटककर, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश खैरनार यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रारंभी गिरीश जोशी यांनी प्रास्ताविक केले. मिला- जुला गझल, टेरेसवरच्या कविता हे ध्यास उपक्रम आम्ही दर्जेदारपणे चालू ठेवणार आहोत.