रस्त्यावर खिळखिळ्या, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसेस; अपघात झाला तर जबाबदार कोण?
By संतोष हिरेमठ | Published: February 8, 2024 07:26 PM2024-02-08T19:26:05+5:302024-02-08T19:26:22+5:30
नादुरुस्त, खराब बसविषयी काही तक्रार करायची असेल तर प्रवासी बसस्थानकातील स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात.
छत्रपती संभाजीनगर : नियमानुसार १५ वर्षांवरील एसटी बस भंगारात काढली जाते. १५ वर्षांवरील एकही बस रस्त्यावर धावत नसल्याचा दावा केला जातो. मात्र, खिळखिळ्या, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसगाड्यांमुळे प्रवासी हैराण तर होतात. मात्र, अशा बसेसला अपघात झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जातो.
जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५२९ बसेस आहे. यातील काही बसेस नादुरुस्तीमुळे कार्यशाळेतच असतात, तर काही बसेस नादुरुस्त अवस्थेतच धावतात. लाईट बंद आहे, गरम होऊन बस बंद पडते, प्रेशर लिक आहे, गिअर अचानक सटकतो, सीट तुटलेल्या यासह अनेक तक्रारी चालकांकडून होत असल्याची स्थिती आहे.
- मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या या स्लीपर प्लस सिटिंग बसला जागोजागी पत्र्याचे ठिगळ लावलेले पाहायला मिळाले.
- बसस्थानकाबाहेर पडणारी खिळखिळी झालेली बस.
१३ बसेस भंगारात
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १३ बसेस भंगारात काढण्यात आल्या. यात सिल्लोड आगारातील ३, कन्नड आगारातील २, सिडको बसस्थानकातील ४, मध्यवर्ती बसस्थानक, गंगापूर, पैठण, सोयगाव आगारातील प्रत्येकी एक बस भंगारात काढण्यात आली.
सध्या कोणत्या आगारात किती बसेस?
आगार - बसेस
सिडको बसस्थानक - ८४
मध्यवर्ती बसस्थानक - ११९
पैठण- ६५
सिल्लोड - ७०
वैजापूर- ५१
कन्नड- ५१
गंगापूर - ५३
सोयगाव- ३६
प्रवाशांनी बसेसबाबत तक्रार कोठे करायची?
नादुरुस्त, खराब बसविषयी काही तक्रार करायची असेल तर प्रवासी बसस्थानकातील स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात.
१५ वर्षांवरील एकही बस नाही
जिल्ह्यात सध्या १५ वर्षांवरील एकही बस नाही. १५ वर्षांवरील बस भंगारात काढल्या जातात. सध्या असलेल्या बसेसची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती केली जाते.
- श्रावण सोनवणे, यंत्र अभियंता, एसटी महामंडळ