लॉकडाऊनमुळे रिक्षाचे हप्ते थकले, फायनान्स कंपनीच्या धमक्याने चालकाने उचले टोकाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 02:36 PM2021-09-27T14:36:32+5:302021-09-27T14:46:05+5:30
वसुली पथकाच्या धमक्यामुळे कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या
औरंगाबाद : ऑटो रिक्षाचे थकलेले हप्ते भरण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली टीमच्या सततच्या धमक्यांना कंटाळून घाबरलेला रिक्षाचालक संतोष पावशे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असून, फायनान्स कंपनीच्या ४ जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.
खासगी फायनान्सचे शेख इमरान शेख अब्दुल माजिद (रा. दादा कॉलनी), जावेद साबेर कुरेशी (रा. सिल्लेखाना औरंगाबाद), अंकुश रामराव कांबळे (रा. चिकलठाणा), ॲड. अनंत एस. लऊळकर (रा. एरंडवणे, पुणे) आणि फायनान्सचे इतर कर्मचारी अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना काळात लॉकडाऊनने सर्वच थांबले. त्यात रिक्षाचा धंदाही संपला. त्यामुळे कर्जाचे हप्ते थांबले. त्यातच पावशे यांनी रिक्षाही विक्री केली. रिक्षाचे थकलेले हप्ते भरण्यासाठी आरोपींनी पावशे यांना धमकावणे सुरू केले होते. या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कमल संतोष पावशे (२७. रा. रामनगर, एन-२ सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. ३ मे ते दि.२५ सप्टेंबर २०२१ या काळात उपरोक्त आरोपी वसुलीसाठी सतत फोन करून धमक्या देत होते.
ठाण्यासमोर जमाव..
वसुलीसाठी सतत अपशब्द वापरून अपमानित करणे, जीवे मारण्याची धमकी देणे यामुळेच पतीने आत्महत्या केली. यास कारणीभूत आरोपीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी अतुल घडामोडे, सुभाष पाटील, सुनील सूर्यवंशी, बापू घडामोडे, सुभाष शुक्ला, मोहन साळवे यांच्यासह मोठा जमाव रविवारी सकाळी मुकुंदवाडी ठाण्यासमोर जमा झाला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीनातेवाइकांनी लावून धरली होती, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणण्याचा इशाराही दिला होता. पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी गुन्हा दाखल केल्यावर जमाव निघून गेला. उपनिरीक्षक वैशाली गुळवे अधिक तपास करीत आहेत.