पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचविण्यासाठी अपघातात ‘कार’ऐवजी दाखविली ‘रिक्षा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 12:26 PM2022-03-08T12:26:54+5:302022-03-08T12:27:57+5:30
खंडपीठाची पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींना नोटीस
औरंगाबाद : अपघाताच्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचविण्यासाठी पोलिसांनी अपघात करणाऱ्या कारऐवजी रिक्षाने अपघात घडल्याचे दाखवून रिक्षाचालकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या या कृतीविरुध्द दाखल याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. संदीपकुमार सी. मोरे यांनी पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदींना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला आहे. सहायक सरकारी वकिलांनी पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने नोटिसा स्वीकारल्या. याचिकेवर २९ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. खंडपीठाने वरील अपघाताशी संबंधित सर्व कागदपत्रे मागविली आहेत.
काय होती घटना...
ढोरेगाव येथील पेट्रोल पंपासमोर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी एका कारने मोटारसायकलस्वार बाबासाहेब बोराडे यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेबचे भाऊ पुंजाराम यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमरजित बाविस्कर या कारचालकाविरुद्ध गुन्हाही दाखल केला. परंतु, न्यायालयात दोषारोपपत्र मात्र रिक्षाचालक रवी काकडे याच्याविरुध्द दाखल केले. पुंजाराम यांनी ॲड. रवींद्र गोरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. ॲड. गोरे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, अपघात करणारा अमरजित पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्यामुळे तसेच अपघातावेळी त्याच्या कारचा विमा नसल्यामुळे, त्याला नुकसान भरपाईपासून आणि गुन्ह्यापासून वाचविण्यासाठी पोलिसांनी बनावट आरोपी उभा केला आहे. पोलिसांनी अशी घटना दाखविली, की बाबासाहेबच्या मोटारसायकलीचा काकडेच्या रिक्षाला धक्का लागला, त्यामुळे मोटारसायकल रस्ता दुभाजकाला धडकली. पलीकडच्या रस्त्यावर नगरकडून येणाऱ्या कारला त्याची मोटारसायकल धडकली.
अपघातग्रस्त दाखविलेली रिक्षा भंगारमधील
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखल करणे गरजेचे असताना ते केले नाही. अपघातग्रस्त दाखविलेली रिक्षा भंगारमधील आहे. काकडे याचा गंगापूरचा पत्ता दाखवला असला तरी, तो तेथे राहत नाही. पंचनाम्यात अमरजितची कार आणि बाबासाहेब याची मोटारसायकल यांच्यात अपघात झाल्याचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. अमरजितच्या कारचे बंपर तुटलेले व त्याला रक्त लागलेले असल्याचे सिध्द करणारा साक्षीदार उपलब्ध आहे. बनावट आरोपी रवी याने त्याचा निष्काळजीपणा मान्य केला आहे. या सर्व बाबींवरून अमरजितला वाचविण्यासाठीच बनावट आरोपी उभा केल्याचे दिसून येते. ॲड. गोरे यांना ॲड. चंद्रकांत बोडखे, ॲड. स्वप्नील मुळे व ॲड. पल्लवी वांगीकर सहकार्य करीत आहेत.