सोन्याच्या बांगड्या पळविल्याप्रकरणी रिक्षाचालक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:34 PM2019-04-05T22:34:22+5:302019-04-05T22:34:32+5:30
पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्याच्या गुन्ह्यातील संशयित रिक्षाचालकाला गुन्हे शाखेने ५ एप्रिल रोजी अटक केली.
औरंगाबाद : साथीदाराच्या मदतीने प्रवासी महिलेच्या पिशवीतील पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्याच्या गुन्ह्यातील संशयित रिक्षाचालकाला गुन्हे शाखेने ५ एप्रिल रोजी अटक केली. गुन्ह्यातील रिक्षा पोलिसांनी जप्त केली.
शेख उस्मान ऊर्फ गिट्टी शेख महंमद (३०, रा. फातेमानगर), असे अटकेतील रिक्षाचालकाचे नाव आहे. शेख उस्मान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रिक्षा जप्त केली. त्याने १ एप्रिल रोजी प्रवासी महिलेला रेल्वेस्टेशन येथून आणले आणि सिडको बसस्थानक परिसरात सोडल्याची कबुली दिली. त्यावेळी महिलेशेजारी सहप्रवासी म्हणून बसलेल्या दोन प्रवाशांनी महिलेच्या बॅगमधून पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या होत्या. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.