रिक्षाचालकांनी घेतली वानराची धास्ती
By Admin | Published: August 27, 2014 11:13 PM2014-08-27T23:13:34+5:302014-08-27T23:36:43+5:30
मोहन बोराडे, सेलू रेल्वेस्थानक परिसरात एक वानर अॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास चोप देत आहे तर कधी चावा घेत आहे़ यामुळे या परिसरातील अॅटोचालक चांगलेच धास्तावले आहेत.
मोहन बोराडे, सेलू
रेल्वेस्थानक परिसरात एक वानर अॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास चोप देत आहे तर कधी चावा घेत आहे़ यामुळे या परिसरातील अॅटोचालक चांगलेच धास्तावले आहेत. बुधवारी त्यांनी पोलिस स्टेशन गाठून ‘त्या’ वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिसांना केली आहे़
रेल्वे स्टेशन परिसरात नर जातीचे सुदृढ वानर मागील पंधरा दिवसांपासून आॅटोचालकांचा पिच्छा पुरवत आहे़ या वानराने आॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास थापडाने मारहाण व चावा घेण्याचा सपाटा लावला आहे़ विशेष म्हणजे केवळ अॅटो सुरू असतानाच हे वानर आॅटोचालकांवर तुटून पडत आहे़ इतर अॅटोतील प्रवाशांना मात्र ते काहीही इजा करत नाही़ त्यामुळे आॅटोचालक या परिसरात अॅटो चालविण्यास धजावत नाहीत़ रेल्वे स्टेशन परिसरात आॅटोचालक भाऊ मुकणे यांना या वानराने तीन वेळा अॅटोचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला चढविला तर एक वेळा खांद्याला चावा घेतला़ तर अन्य एका आॅटोचालकाला आदर्शनगर परिसरात ‘त्या’ वानराने गाठून मांडीचा चावा घेतला़ तर फुलेनगर परिसरात बुधवारी सकाळी माणिक कुरे या आॅटोचालकाला या वानराने मारहाण केली़ चालत्या आॅटोमध्ये अचानक वानराने झडप मारल्यामुळे आॅटोचालकाचे नियंत्रन सुटले व आॅटो रस्त्यावर उलटला़ सुदैवाने या आॅटोरिक्षात प्रवाशी नव्हते़ सदरील वानराच्या प्रतापामुळे आॅटोचालक हैराण झाले. त्यामुळे त्यांनी बुधवारी सकाळी आॅटोसह पोलिस स्टेशनमध्ये धाव घेवून सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबूराव राठोड यांच्याकडे वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली़ पंधरा दिवसापासून रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात आॅटोचालकांचा पाठलाग करून हे वानर त्यांच्यावर हल्ला चढवित आहे़ त्यामुळे आॅटोचालक भयभीत झाले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़