रिक्षाचालकांचे कधी राइट, तर कधी लेफ्ट, पळवापळीने प्रवाशांना वैताग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:52+5:302021-09-21T04:04:52+5:30
जिल्ह्यात ३५ हजारांवर रिक्षा : सध्या मीटरने रिक्षाचा प्रवास इतिहासजमाच, कारवाई कधी तरी औरंगाबाद : जालना रोडवर कुठेही एखादा ...
जिल्ह्यात ३५ हजारांवर रिक्षा : सध्या मीटरने रिक्षाचा प्रवास इतिहासजमाच, कारवाई कधी तरी
औरंगाबाद : जालना रोडवर कुठेही एखादा प्रवासी उभा दिसला की, मागच्या वाहनांचा विचार न करता रिक्षाचालक सरळ डाव्या बाजूने वळतात आणि अचानक थांबतात. त्यानंतर प्रवासी बसला की, पुन्हा वेगात उजव्या बाजूने पुढे जाण्याचा खटाटोप करतात. या परिस्थितीमुळे क्षणोक्षणी अपघाताची भीती असते. याबरोबरच रेल्वेस्टेशन, बसस्थानक, बाबा पेट्रोल पंप आणि शहर बस थांब्यांसमोर थांबून रिक्षाचालकांकडून जोरजोरात आवाज देऊन प्रवाशांची अक्षरश: पळवापळवी केली जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील रिक्षांची संख्या सध्या ३५ हजारांवर गेली आहे. यातील बहुतांश रिक्षा या शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. रस्त्यावर कोणीही उभा दिसला की रिक्षा थांबलीच, अशी स्थिती आहे. शहरातील बसथांब्यांच्या परिसरावर रिक्षांनी कब्जा केलेला दिसतो. रेल्वेस्टेशन, बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच थांबून रिक्षाचालक ‘बाबा हैं क्या, बसस्टँड, वाळूज, चिकलठाणा हैं क्या...’, असा आवाज देत प्रवाशांच्या मागे लागतात. मीटरने रिक्षाचा प्रवास सध्या इतिहासजमाच झाल्यासारखे आहे. कारण, कोणताही रिक्षाचालक मीटरने जाण्यास सहजासहजी तयार होत नाही. ठरावीक पैसे सांगून रिक्षाचालक मोकळे होतात, तर कमी पैशात एखाद्या भागात जाण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जातात. जालना रोडवर अशा रिक्षा धावताना दिसतात; परंतु त्यांच्यावर कधी तरी कारवाई होते.
------
याठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
रेल्वेस्टेशन
रेल्वेस्टेशन परिसरात रिक्षाचालकांची सर्वाधिक मनमानी पाहायला मिळते. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. चिकलठाणा, सातारा, वाळूज महानगरात जाणाऱ्या प्रवाशांना अवाच्या सव्वा भाडे सांगितले जाते. रात्रीच्या वेळी अधिक भाडे आकारले जाते.
घाटी परिसर
घाटी रुग्णालयात गोरगरीब रुग्ण येतात. उपचारानंतर बसस्थानक, रेल्वेस्टेशन आणि शहरातील विविध भागांत जाण्यासाठी रिक्षाचालक वाटेल तसे भाडे आकारतात. मीटरने येण्यासही सर्रास नकार दिला जातो.
बसस्थानक
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून रेल्वेस्टेशनला जाण्यासाठी ६० रुपये आकारण्यात येत आहेत. प्रवासी पाहून ही रक्कम कमी-अधिक केली जाते; परंतु याठिकाणीही रिक्षाचालक मीटरने जाण्यास नकार देतात.
-------
प्रवाशांना त्रास
रिक्षा प्रवाशांनी भरून गेलेली असली तरीही थोडे सरका म्हणत रिक्षाचालक प्रवासी कोंबतात. अशावेळी काही बोलायला गेले, तर वाईट शब्दांत रिक्षाचालक बोलतात. नाइलाज असल्याने रिक्षातून अनेकदा प्रवास करावा लागतो.
- आशिष खिल्लारे
----
सगळेच रिक्षाचालक चुकीचे आहेत, असे नाही; परंतु काही रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. अनेक रिक्षाचालक बसण्यापूर्वी एक रक्कम सांगतात आणि प्रवासानंतर अधिक रक्कम मागतात. त्यामुळे त्यांच्यासोबत वाद घालावा लागतो.
- धनंजय जाधव
-------
नियमितपणे कारवाई
नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओ कार्यालयाकडून नियमितपणे कारवाई केली जाते. ही कारवाई अगदी रोज होते. केवळ ही संख्या समोर येत नाही. रिक्षांबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनावर कारवाई होते.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी