परमीटविनाच धावतात रिक्षा
By Admin | Published: May 8, 2017 11:26 PM2017-05-08T23:26:52+5:302017-05-08T23:29:33+5:30
बीड : बारा ते पंधरा वर्षाहून अधिक वर्ष झालेल्या जुन्या वाहनांच्या धूरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
व्यंकटेश वैष्णव । लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बारा ते पंधरा वर्षाहून अधिक वर्ष झालेल्या जुन्या वाहनांच्या धूरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आरटीओ कार्यालय व वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने विनापरमीट आॅटोरिक्षांवर कारवाई मोहीम सुरू केली होती. मात्र, मध्येच ही कारवाई थंडावली आहे.
बीड जिल्ह्यात १२६० आॅटोरिक्षांना आरटीओ कार्यालयाचे परमीट आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना दिलेल्या ४५ रिक्षांना आरटीओ कार्यालयाने परमीट दिलेले आहे. याशिवाय चालणाऱ्या आॅटोरिक्षा नियमबाह्य चालविल्या जात असल्याचे चित्र अंबाजोगाई वगळता इतर तालुक्यांत दिसते. १५ दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने बीड शहरातील अवैध रिक्षांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, ही मोहीम २-४ दिवस चालल्यानंतर पुन्हा बंद झाली.
१०-१२ वर्षे जुन्या झालेल्या रिक्षांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात धूर प्रदूषण होत आहे. याचा शहरवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या रिक्षांना आरटीओ कार्यालयाचे परमीट नाही (पिवळी पाटी) त्या रिक्षा घरगुती वापरासाठी म्हणून पासिंग करून घेतलेल्या आहेत. मात्र, सर्रास त्यातून प्रवासी वाहतूक केली जात आहे. मुंबई-पुणे येथील पासिंगच्या जुन्या आॅटोरिक्षा बीड शहरात मोठ्या प्रमाणात धावत आहेत. या रिक्षा जुन्या झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर प्रदूषण होते. याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी केला.