पादचाऱ्याच्या अंगावर रिक्षा घालून पाडले; मारहाण करून मोबाईल पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:45 PM2020-02-28T13:45:12+5:302020-02-28T13:47:53+5:30

विद्यानगर येथे मध्यरात्री थरार :

The rickshaw was thrown on the walker; Mobile escapes after beating | पादचाऱ्याच्या अंगावर रिक्षा घालून पाडले; मारहाण करून मोबाईल पळवला

पादचाऱ्याच्या अंगावर रिक्षा घालून पाडले; मारहाण करून मोबाईल पळवला

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाण करून हिसकावून नेला मोबाईल

औरंगाबाद : लुटमार करण्याच्या उद्देशाने चक्क पादचाऱ्याच्या अंगावर दोन वेळा रिक्षा घालून खाली पाडल्यानंतर मोबाईल हिसकावून रिक्षाचालकासह त्याचे साथीदार पळून गेले. अंगावर काटा आणणारी थरारक घटना विद्यानगर येथे बुधवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. पुंडलिकनगर पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला.

विद्यानगर येथील गिरीश व्यंकटराव गोळेगावकर (४५) हे एका औषधी कंपनीत विक्री प्रतिनिधी (एम.आर.) आहेत. कंपनीच्या कामानिमित्त ते बुधवारी परभणीला गेले होते. तेथील काम आटोपून ते मध्यरात्री रेल्वेने औरंगाबादेत आले. रेल्वेस्टेशन येथून रिक्षाने ते सेव्हन हिल येथे उतरले. पाठीवर बॅग घेऊन ते विद्यानगर येथील घरी पायी जाऊ लागले. गजानन महाराज मंदिर रोडवरील विद्यानगरच्या वळणावर उभ्या रिक्षात दोन प्रवासी बसलेले होते. 

यावेळी रिक्षाचालकाने त्यांना रिक्षा हवी आहे का असे विचारले. नाही, म्हणत ते जवळच राहत असल्याचे रिक्षाचालकाला त्यांनी सांगितले. यावेळी रिक्षाचालक आणि सोबतच्या लोकांच्या हालचाली त्याना संशयास्पद वाटल्याने गोळेगावकर मागे पाहतच पुढे निघाले. तेवढ्यात रिक्षातील एक जण कॉर्नरवर थांबला आणि रिक्षाचालक सुसाट वेगाने त्यांच्या मागे येत असल्याचे त्यांना दिसले. रिक्षाला रस्ता द्यावा म्हणून ते बाजूला होत असतानाच चालकाने थेट त्यांच्या अंगावर रिक्षा घातली. यावेळी गोळेगावकर हे रिक्षा आणि भिंतीच्या मध्ये दबले. रिक्षा थांबताच प्रसंगावधान राखून गोळेगावकर वाचवा, वाचवा म्हणत पळत सुटले असता रिक्षातील एक जण त्यांच्या मागे लागला. यानंतर रिक्षाचालकही पुन्हा त्यांच्या दिशेने सुसाट आला आणि त्याने पुन्हा गोळेगावकर यांच्या अंगावर रिक्षा घातल्याने ते खाली पडले. त्यांच्या खिशातील मोबाईलही पडला. यावेळी त्यांनी आरडाओरड सुरूच ठेवली होती. यावेळी गोळेगावकर यांचा मोबाईल घेऊन आरोपी रिक्षासह तेथून निघून गेले. या घटनेत गोळेगावकर यांच्या पायाला दुखापत झाली आणि ते प्रचंड घाबरले.

सीसीटीव्हीमध्ये घटना कैद 
ही सर्व घटना विद्यानगर येथील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली. आरोपींनी अंगावर रिक्षा घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईल पळविल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना फोन करून कळविली. पोलिसांनी रात्री घटनास्थळी न जाता, गोळेगावकर यांना सकाळी ठाण्यात बोलावून त्यांचा अर्ज घेतला. 

Web Title: The rickshaw was thrown on the walker; Mobile escapes after beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.