दत्तक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला सश्रम कारावास आणि दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:22 AM2019-07-11T00:22:16+5:302019-07-11T00:22:37+5:30
दत्तक घेतलेल्या १४ वर्षीय मुलीच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार करणारा साठीतला आरोपी बाबूल खान पठाण याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि एकूण ३ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. पीडित मुलीची आई भोळसर असून, तिचे वडील वारलेले आहेत. आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
औरंगाबाद : दत्तक घेतलेल्या १४ वर्षीय मुलीच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार करणारा साठीतला आरोपी बाबूल खान पठाण याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि एकूण ३ हजार ५०० रुपये दंड ठोठावला.
पीडित मुलीची आई भोळसर असून, तिचे वडील वारलेले आहेत. आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
घटनेच्या वेळी इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी बाबूल खान पठाण (६०, रा. औरंगाबाद जिल्हा) व त्याच्या पत्नीने त्या मुलीला दत्तक घेतले होते. १६ डिसेंबर २०१६ रोजी बाबूल खानची पत्नी लग्नासाठी बाहेरगावी गेली होती. घरात मुलगी व बाबूल खान हे दोघेच होते. मुलगी रात्री जेवण करून झोपली असता, बाबूल खानने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसºया दिवशीही त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यापूर्वीही त्याने तिला त्रास दिला होता. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून मुलीने १८ डिसेंबर रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल के ले होते.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील उल्हास पवार यांनी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३७६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंड ठोठावला, तसेच कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. सदर पीडित मुलीला न्यायालयाच्या आदेशानुसार अनाथाश्रमात ठेवण्यात आले आहे.