अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:12 PM2019-02-05T23:12:29+5:302019-02-05T23:12:54+5:30
दहावीत शिक्षण घेणाºया अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा संदीप मदन जारवाल (२१, रा. फुलंब्री) याला सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.५) एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : दहावीत शिक्षण घेणाºया अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा संदीप मदन जारवाल (२१, रा. फुलंब्री) याला सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.५) एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात पीडितेच्या वडिलांनी तक्रार दिली होती. २२ मार्च २०१७ रोजी पीडितेची १० वीची परीक्षा होती. तिचे वडील तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता काही मुलांनी पीडिता परीक्षेला आली नसल्याचे सांगितले. पीडितेच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली. तेव्हा ती आरोपी संदीपसोबत दिसल्याचे तिने सांगितले. मुलीच्या वडिलांनी संदीपच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याच्या घरच्यांनी तो चार दिवसांपासून कचनेरला दाजीकडे गेल्याचे सांगितले. त्यावरून मुलीला आरोपी संदीपने पळवून नेल्याचे पीडितेच्या वडिलांच्या लक्षात आले. यासंदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला अपहरणाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३६३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. सुनावणीवेळी अॅड. अविनाश कोकाटे यांनी सहकार्य केले.