टवाळखोरांनी केली दंगल, परिणाम बाजारपेठेवर; भीतीने ग्राहकांची खरेदीकडे पाठ
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 1, 2023 08:09 PM2023-04-01T20:09:39+5:302023-04-01T20:11:25+5:30
सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले.
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री किराडपुरा भागात दगडफेक, जाळपोळीची अप्रिय घटना घडली. शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती जटवाडा रोडवरील ओहर या गावात झाली. याचा मोठा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला. गुरुवारची रामनवमी त्यात गुरुपुष्यामृत योग आणि रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार असे असतानाही मागील दोन दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावर रहदारी होती. पण, दुकानात ग्राहक तुरळक होते.
किराडपुऱ्यातील दंगलीनंतर लगातार दुसऱ्या दिवशी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे पाहण्यास मिळाले. सर्वत्र व्यवहार सुरळीत आहे. मात्र, खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणे टाळले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने सध्या नवीन खरेदी टाळा, असा सल्ला घरातूनच महिलांना देण्यात आला होता. यंदा रामनवमी व गुरुपुष्यामृत असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित होती. पण, गुरुवारी पहाटे दंगलीची बातमी सर्वत्र पसरली आणि ग्राहकांनी बाजारात येणे टाळले. त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर दिसला. आज रमजान महिन्यातील पहिला शुक्रवार होता. सकाळपासून खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. पण, बाजारात नेहमीपेक्षा १० टक्केही उलाढाल झाली नाही. यामुळे लाखो, कोट्यवधीचा माल दुकानात भरून ठेवल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
२४ कोटीच्या उलाढालीवर पाणी
टवाळखोर दंगल करतात. पण, त्याचा दूरगामी परिणाम बाजारपेठेवर होत असतो. मागील दोन दिवसात याची प्रचिती सर्वांना आली. दोन दिवसात २४ कोटीच्या उलाढालीवर पाणी फेरले. यातही मुहूर्ताच्या हिशोबाने कापड व्यापारी, सोने - चांदीच्या विक्रीवर सर्वाधिक परिणाम झाला.
-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स
फळांच्या विक्रीवर २० टक्के परिणाम
रमजान महिन्यात फळांची मोठी उलाढाल होते. दंगलीचा परिणाम बाजारपेठेवर झाला. पण, फळांच्या विक्रीवर झाला नाही. कारण, फळांची विक्री तेवढीच आहे. मात्र, गुरुवारी रामनवमीनिमित्त खरबूज, रामफळ, अंगुर यांच्या विक्रीवर २० टक्के परिणाम झाला.
अश्फाक मोहमद, फळ विक्रेता.
व्यापाऱ्यांना भोगावा लागतो परिणाम
सध्या वार्षिक धान्य खरेदीचे दिवस आहेत. मात्र, दंगलीनंतर मागील दोन दिवसात धान्य बाजारातील ग्राहक गायब झाला आहे. दंगलीचा परिणाम व्यापाऱ्यांना भोगावा लागतो. कारण, कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.
संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ