जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने जगणं झालं महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:05 AM2021-03-23T04:05:32+5:302021-03-23T04:05:32+5:30
जयेश निरपळ गंगापूर : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा आलेख चढता असून, मार्च महिन्यात खाद्य तेलाच्या व गॅसच्या ...
जयेश निरपळ
गंगापूर : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा आलेख चढता असून, मार्च महिन्यात खाद्य तेलाच्या व गॅसच्या भावात विक्रमी वाढ झाल्याने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. महागाईच्या मानाने उत्पन्नात कवडीचीही वाढ झालेली नसून दरवाढीच्या झळा सहन करत घरखर्चाचे नियोजन करणे अवघड झाले आहे.
ऑक्टोबर २०२०पासून कडधान्य व डाळींचे दर कडाडले असून, खाद्य तेलाच्या किमतीमध्ये दिवाळीपासून सुरू झालेल्या दरवाढीने मार्च २०२१ मध्ये उच्चांक गाठला आहे. यामुळे गरिबांचेच नव्हे तर, सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. शेंगदाणा तेलाची मागणी कमी असल्याने फेब्रुवारीपासून दर स्थिर असले, तरी गत सहा महिन्यांत सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या किमतीत अनुक्रमे २४, १९ व २२ टक्के वाढ झाली असून, आधी एकाच वेळी पाच लीटर तेलाची खरेदी करणारे ग्राहक आता पाहिजे तेव्हाच तेलाची खरेदी करतांना दिसत आहेत.
तेलाप्रमाणेच मूग, मसूर व उडीद डाळीच्या किमतीतदेखील या कालावधीत आठ ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. चणा व तूरडाळ स्वस्त धान्य दुकानात मिळत असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. गॅसचे भाव तब्बल २७ टक्क्यांनी वाढले असून, ऑक्टोबरमध्ये ६०३ रुपयाला मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर या महिन्यात ८२८ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच केंद्र सरकारने चोरमार्गाने गॅसचे मिळणारे अनुदान हळूहळू बंद करुन संपविल्याने गरीब जीवन जगणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅसच्या भडक्याने तर ग्रामीण भागात बंद झालेल्या चुली पुन्हा सुरु झाल्या असून, महिला पुन्हा धुरात डोळे फोडीत स्वयंपाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
रोजंदारी, उत्पन्नात घट, महागाईत मात्र वाढ
वाढलेल्या महागाईचा फटका श्रीमंत नागरिकांना जाणवत नसला तरी, याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर तसेच शहरांमध्ये रोजंदारीवर पोट भरणाऱ्या नागरिकांना बसला आहे. मजुरांच्या मजुरीत वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्नही घटले आहे. शेतमालाला भाव नाही. यामुळे वाढलेली महागाई ही गरिबांसह सर्वसामान्यांच्या मुळावरच उठली आहे. त्यांना मर्यादित उत्पन्न व वाढत्या खर्चाचे नियोजन करतांना कसरत करावी लागत आहे.
चौकट
भाजीवरील तर्री झाली गायब
गोडेतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या भाजीत तेल असून, नसल्यासारखे आहे. तर सर्वसामान्यांच्या भाजीतील तर्री गायब झाल्याचे दिसत आहे. डाळींचेही भाव वाढल्याने शिजविलेल्या डाळींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढले आहे.
फोटो : चार्ट आहे.