रुग्णांच्या फुप्फुसाच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याचा धोका
By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:08+5:302020-12-02T04:05:08+5:30
औरंगाबाद : कोरोनानंतर रुग्णांच्या फुप्फुसाच्या रक्तनलिकांमध्ये गाठ तयार होऊन मृत्यूचा धोका निर्माण होत आहे. कोरोनाच्या उपचार घेतलेल्या एका कोरोना ...
औरंगाबाद : कोरोनानंतर रुग्णांच्या फुप्फुसाच्या रक्तनलिकांमध्ये गाठ तयार होऊन मृत्यूचा धोका निर्माण होत आहे. कोरोनाच्या उपचार घेतलेल्या एका कोरोना याेद्धा डॉक्टरलाच धोक्याला तोंड द्यावे लागले. सुदैवाने या डॉक्टर रुग्णावर एमजीएम रुग्णालयात तब्बल ५ तासांची शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले.
एमजीएम रुग्णालयात सोमवारी पत्रकार परिषदेत अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. राहुल चौधरी, डॉ. प्रशांत उदगिरे यांनी या उपचाराविषयी माहिती दिली. एका डॉक्टरला कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर या डॉक्टरांना सुटी देण्याची तयारी सुरू होती. त्याच वेळी स्वच्छतागृहात ते अचानक कोसळले. त्यांची ऑक्सिजनची पातळी ६० टक्क्यांवर आली होती. त्यांना व्हेंटिलेटर लावावे लागले. त्यांची सिटी पल्मोनरी अंजिओग्राफी केली असता फुप्फुसाच्या नसांमध्ये रक्ताची गाठ आढळून आली. डॉ. राहुल चौधरी, डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. अभिनव छाबडा, डॉ. राहुल पाटणी यांनी थ्रबो सक्शन प्रक्रिया, गाठ विरघळण्याच्या इंजेक्शनद्वारे उपचाराची गुंतागुंत प्रक्रिया पार पाडली. ५ तासांच्या प्रयत्नांनंतर रुग्ण स्थिर झाला. रुग्णाला सुटीही देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बरे झालेले रुग्ण गंभीर
डॉ. प्रवीण सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाचे उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल होतात. हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांपेक्षाही फुप्फुसाच्या रक्तनलिकांमध्ये गाठ असलेल्या रुग्णांना अधिक धोका दिसते. कारण त्यांच्या उपचारासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे वेळीच गाठीचे निदान होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.