विमानतळावर घुसखोरीचा धोका

By Admin | Published: June 15, 2016 11:51 PM2016-06-15T23:51:03+5:302016-06-16T00:13:15+5:30

संतोष हिरेमठ, औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमीच सुरक्षेच्या घेऱ्यात असते. परंतु काही आगंतुक ही सुरक्षा यंत्रणा सहज भेदत आहेत.

The risk of infiltration at the airport | विमानतळावर घुसखोरीचा धोका

विमानतळावर घुसखोरीचा धोका

googlenewsNext

संतोष हिरेमठ, औरंगाबाद
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमीच सुरक्षेच्या घेऱ्यात असते. परंतु काही आगंतुक ही सुरक्षा यंत्रणा सहज भेदत आहेत. पण ही कोणी माणसे नसून ती मोकाट कुत्री आहेत. गेल्या आठ महिन्यांत विमानतळावर ९० कुत्री पकडण्यात आली. संरक्षक भिंतीची उंची, भिंतीजवळच बांधण्यात आलेली घरे, भिंतीखालून वाहणारी नाली, यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घातपाताच्या इराद्याने कोणीही सहज घुसखोरी करू शकतो. विमानतळाच्या याच परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.
विमानतळाच्या धावपट्टीवर फिरणाऱ्या ३ मोकाट कुत्र्यांमुळे मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण तब्बल सव्वातास लांबले. धावपट्टीवर आलेल्या या कुत्र्यांना जेरबंद केल्यानंतरच या विमानाचे टेकआॅफ झाले. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ७३ प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत चिकलठाणा विमानतळाच्या प्रशासनाचीही तक्रार आहे. ही समस्या विमानतळ प्राधिकरणासाठी सर्वाधिक गंभीर बाब आहे.
विमानतळाच्या हद्दीत घुसणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे धोकादायक परिस्थितीला तोंड देण्याची वेळ विमानतळ प्रशासनावर येत आहे. मोकाट कुत्रे विमानतळाच्या हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. परंतु केवळ श्वानपथकाला पाचारण करून मोकाट कुत्री पकडण्यावर भर दिला जात आहे.
आतून १० फूट; बाहेरून ४ फुट भिंत
विमानतळाच्या चोहोबाजूंनी जवळपास १५ कि. मी. लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत महत्त्वाची आहे. परंतु आजघडीला संरक्षक भिंतीच्या परिस्थितीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. विमानतळाच्या हद्दीतून संरक्षक भिंतीची उंची १० फुटांची आहे. परंतु विमानतळाच्या हद्दीबाहेर मात्र, ठिकठिकाणी संरक्षक भिंतीची उंची अवघ्या ४ ते ५ फुटांची आहे. त्यामुळे कोणालाही विमानतळाच्या हद्दीत डोकावता येत आहे. अशा कमी उंचीच्या ठिकाणाहून मोकाट कुत्री सहज विमानतळाच्या परिसरात प्रवेश करू शकतात.
लँड होणारे विमान झेपावले
आॅगस्ट २०१४ मध्ये कुत्र्यांमुळे लँड होता होता विमानाला पुन्हा हवेत झेप घ्यावी लागली होती. मुंबईहून येणारे विमान धावपट्टीवर उतरत होते. चाके धावपट्टीवर टेकणार असे वाटत असताना अचानक विमानाने वेग घेतला आणि पुन्हा हवेत झेपावले. या घटनेने १३० प्रवासी गोंधळून गेले. मोकाट कुत्र्यांचा वावर पाहता या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका अधिक आहे.
दुर्घटना झाल्यास परवाना निलंबित
विमानतळावर कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ‘डीजीसीए’ने आपले नियम अधिक कडक केले आहेत. यामध्ये विमानतळावर एखादी दुर्घटना झाल्यास थेट विमानतळाचा परवाना निलंबित केला जातो. त्यामुळे अशी परिस्थिती उद््भवू नये, यासाठी मोकाट कुत्र्यांचा होणार प्रवेश, अनधिकृत बांधकामे, उंच झाडे, नाले यांसह अन्य परिस्थितीचा गंभीरतेने विचार करण्याची गरज असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत नमूद केले.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर बुधवारी मनपा आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: The risk of infiltration at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.