कानाची काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती होते गायब

By संतोष हिरेमठ | Published: June 27, 2024 01:53 PM2024-06-27T13:53:52+5:302024-06-27T13:55:34+5:30

कानाचे आरोग्य धोक्यात, गायिका अलका याज्ञिक यांची श्रवणशक्ती गेल्यानंतर एकच चर्चा

Risk of deafness, in Chhatrapati Sambhaji Nagar, more than 100 people lose their hearing every month | कानाची काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती होते गायब

कानाची काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती होते गायब

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वीच चार दशकांपासून आपल्या सुमधुर गायकीने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांची अचानकपणे श्रवणशक्ती गेल्याचे समोर आले. त्यामुळे याविषयी एकच चर्चा सुरू आहे. मात्र, शहरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती अचानक गायब होते. ‘व्हायरल इन्फेक्शन’सह काही इतर कारणांनी असे होते, शिवाय सतत हेडफोन, इअरफोन वापरत असाल आणि तेही मोठ्या आवाजात तर त्याचा वापर कमी करावा, आवाज कमी ठेवावा. नाही तर बहिरेपणा येण्याचा धोका नाकारता येत नाही, असे कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणाले.

अगदी ध्यानिमनी नसताना अचानक एका किंवा काही वेळा दोन्ही कानांची ऐकू येण्याची क्रिया बंद पडते. शास्त्रीय भाषेत या आजाराला ‘ सडन सेन्सोरी न्यूरल हेअरिंग लाॅस’ असे नाव आहे. सध्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना झालेल्या या आजारामुळे सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. ‘लोकमत’ने विविध कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे गेल्या महिनाभरात अचानक बहिरेपणा आलेल्या रुग्णांची संख्या जाणून घेतली, तेव्हा ही आकडेवारी चिंतादायक असल्याचे समोर आले. अचानक बहिरेपणा येणे हा आजार दुर्मीळ नसून, बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतो, असेही कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितले.

शहरात कान-नाक-घसा तज्ज्ञ- ६५

१०० पैकी ३० टक्के रुग्णांना हेडफोन, इअरफोनचे दुखणे
कोरोना प्रादुर्भावानंतर कानाचे दुखणे घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी नमूद केले. वर्क फ्राॅम होममध्ये आणि त्यानंतरही वाढलेला हेडफोनचा वापर, मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने, तसेच वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळेही बहिरेपणा वाढत आहे. शहरातील ईएनटी तज्ज्ञांकडे येणाऱ्या शंभर रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे हेडफोन, इअरफोनचे दुखणे घेऊन येत आहेत.

का होते असे?
अनेक प्रकारचे विषाणू, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, वयोमानानुसार येणाऱ्या बहिरेपणासह ‘डीजे’च्या खूप मोठ्या आवाजाने, हेडफोन लावून सतत मोठा आवाज कानावर पडत राहिल्याने आणि अशा आणखी काही कारणांनी ही व्याधी उद्भवते.

इमर्जन्सी उपचार आवश्यक
ज्याप्रमाणे हृदयविकार किंवा अर्धांगवायू या आजारामध्ये इमर्जन्सी उपचार आवश्यक असतात. त्याचप्रमाणे, अचानक उद्भवलेल्या बहिरेपणामध्येही गरजेचे असते. सुरुवातीला दिलेल्या या उपचाराने फायदा न झालेल्या रुग्णांना श्रवणयंत्र, ‘काॅक्लिअर इम्प्लांट’सारख्या शस्त्रक्रियांचा पर्याय उपलब्ध आहे. अचानक आलेल्या बहिरेपणाचे निदान केल्यानंतर जितक्या लवकर उपचार सुरू होतील, तितका त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.
- डाॅ.रमेश राेहिवाल, माजी राज्य अध्यक्ष, कान-नाक-घसा तज्ज्ञ संघटना.

घाटीत महिन्याला ५ ते ६ रुग्ण
कान-नाक-घसा विभागात महिन्याला अचानक बहिरेपणा आलेले ५ ते ६ रुग्ण येतात. बहुतेक वेळा ‘व्हायरल इन्फेक्शन’मुळे असे होते. योग्य वेळी स्टिरॉइड्स आणि प्रतिजैविकांनी उपचार केल्यास श्रवणशक्ती पुन्हा मिळू शकते.
- डाॅ.सुनील देशमुख, कान-नाक-घसा विभागप्रमुख, घाटी.

Web Title: Risk of deafness, in Chhatrapati Sambhaji Nagar, more than 100 people lose their hearing every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.