कडक उन्हामुळे डिहायड्रेशनचा धोका; इकडं आरोग्य केंद्रात ‘ओआरएस’चा ‘ठणठणाट’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 02:28 PM2023-05-22T14:28:20+5:302023-05-22T14:32:00+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुटवडा; शासनाकडून पुरवठ्याची प्रतीक्षा, रुग्णांनाच करावी लागतेय खरेदी

Risk of dehydration due to hot sun; no stock of ORS packets in government clinics | कडक उन्हामुळे डिहायड्रेशनचा धोका; इकडं आरोग्य केंद्रात ‘ओआरएस’चा ‘ठणठणाट’

कडक उन्हामुळे डिहायड्रेशनचा धोका; इकडं आरोग्य केंद्रात ‘ओआरएस’चा ‘ठणठणाट’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जलसंजीवनी म्हणजेच 'ओआरएस'. गतवर्षी हजारो रुपयांची ‘ओआरएस’ची पाकिटे कालबाह्य झाल्याचे समोर आले. तर आता जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात ‘ओआरएस’चा ठणठणाट आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर ते रामबाण उपाय ठरतेच. परंतु कडाक्याच्या उन्हाने होणाऱ्या डिहायड्रेशनसाठी उपयुक्त ठरते. परंतु सध्या रुग्णांना स्वत:च्या पैशांतूनच त्याची खरेदी करण्याची वेळ ओढवत आहे.

पावसाळ्यात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये अतिसार (जुलाब) होण्याची शक्यता बळावते. अनेकदा ते त्यांच्या जीवावरही बेतण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दरवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात 'ओआरएस' वाटपाची मोहीम हाती घेतली जाते. शिवाय वर्षभरही गरजू रुग्णांना ‘ओआरएस’ दिले जाते. आजघडीला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ‘ओआरएस’चा साठाच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

उन्हामुळे डिहायड्रेशनचा धोका
जुलाब आणि उलटी हे जरी सामान्य आजार असले तरी ते शरीरातील सगळी शक्ती हिरावून घेतात. अशावेळी ओआरएस बाळाला प्यायला देणे अतिशय रामबाण उपाय ठरू शकतो. पावसाळ्यात हा आजार अधिक उद्भवतो. त्यामुळे आरोग्य विभागाकडून ५ वर्षांखालील बालकांना ओआरएस दिले जाते. उन्हाळ्यात घामामुळे डिहायड्रेशनला सामोरे जावे लागते. अशावेळीही ओआरएस उपयुक्त ठरते. 'डायरिया' व 'डिहायड्रेशन'मध्ये जलसंजीवनीला पर्याय नाही, असे म्हटले जाते.

लवकरच पुरवठा
‘ओआरएस’चा शासनाकडून लवकरच पुरवठा होणार आहे. आगामी १५ दिवसांत पुरवठा झाला नाही तर जिल्हा स्तरावर त्याची खरेदी केली जाईल. शिवाय आरोग्य केंद्रांनी आवश्यकतेनुसार रुग्ण कल्याण निधीतून ‘ओआरएस’ची खरेदी करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.
- डाॅ. अभय धानोरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

‘लोकमत’ने आणला होता कालबाह्यचा प्रकार समोर
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्व यंत्रणा कोविड नियंत्रणात गुंतली होती. तेव्हा हजारो रुपयांची ‘ओआरएस’ची पाकिटे कालबाह्य झाली. एका कक्षात ‘ओआरएस’ची अनेक खोकी लपविण्यात आली होती. यातून शासनाचे हजारो रूपये ‘पाण्यात’ गेले. हा प्रकार ‘लोकमत’ने २४ जुलै २०२२ रोजी ‘कोरोनाने खाल्ली हजारोंची पावडर’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला होता.

-एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र-५१
- एकूण उपकेंद्र- २७९

Web Title: Risk of dehydration due to hot sun; no stock of ORS packets in government clinics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.