महिलांना टाइप- २ मधुमेहाचा धोका; कारण काय? लक्षणे कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 06:48 PM2024-10-04T18:48:01+5:302024-10-04T18:50:14+5:30
वजन जास्त असल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
छत्रपती संभाजीनगर : एखाद्या समारंभात ‘मी गोड खाणे बंद केले आहे, शुगर आहे,’ असे कोणाकडून तरी हमखास ऐकण्यात येते. महिलांना टाइप-२ मधुमेहाचा धोका असतो. विशेषत: जास्त वजन असल्यास हा धोका अधिक असतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासह आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात केली पाहिजे, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञांनी दिला.
काय आहे टाइप- २ मधुमेह?
रक्तातील साखरेचे प्रमाण जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्यास मधुमेह म्हणतात. टाइप- २ मधुमेह हा अयोग्य जीवनशैलीमुळे होतो. यात शरीरात इन्सुलिनचे काम नीट होत नाही व इन्सुलिनचा स्राव कमी प्रमाणात होतो.
कारणे काय?
वजन जास्त असल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अनियमित आहार, जास्त प्रमाणात साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, तसेच शारीरिक व्यायामाचा अभाव हे मधुमेहाचे जोखमीचे घटक आहेत. अनुवांशिकता, कमी झोप, उच्च रक्तदाब आदींमुळेही टाइप-२ मधुमेह होतो.
लक्षणे काय?
वारंवार लघवीस जावे लागणे, मूत्रमार्गावर जंतुसंसर्ग होणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे, जखम बरी न होणे, अंगाला खाज येणे आदी लक्षणे टाइप-२ मधुमेहात दिसतात. मधुमेहामुळे गर्भावस्थेत गुंतागुंत होऊ शकते. मधुमेहामुळे बाळाची नीट वाढ न होणे, रक्तदाब वाढणे, बाळाचे वजन जास्त झाल्यामुळे सिझेरियन करावे लागणे इत्यादी त्रास होऊ शकतात.
काय काळजी घ्याल?
महिलांनी स्वतःचे आरोग्य टिकवून ठेवण्याची त्रिसूत्री म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार. रक्तातील लोहाचे, जीवनसत्त्वांचे व इतर घटकांचे (आयोडिन, मग्नेशिअम, कॅल्शिअम) प्रमाण योग्य राहण्यासाठी सर्व पालेभाज्या, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, डाळी, ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या फळभाज्या, परवडणारी फळे, सुकामेवा, दूध यांचा आहारात समावेश असावा.
योग्य जीवनशैली हवी
महिलांनी योग्य जीवनशैली आत्मसात करून शक्यतो आरोग्याच्या समस्या होऊ न देणेच चांगले. झाल्यास त्या लवकरात लवकर नियंत्रित करणे गरजेचे आहे. उष्मांक वापरून होणारे व्यायाम जसे की, चालणे, पळणे, खेळणे इत्यादी रोज साधरणत: चाळीस मिनिटे करावे. त्यानंतर योगासने व प्राणायम करावा. मांसपेशींना बळकट करणारे व्यायाम आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस करावेत.
- डॉ. मयुरा काळे, अध्यक्ष, मधुमेहतज्ज्ञ संघटना, छत्रपती संभाजीनगर