जलजन्य आजाराचा धोका; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम जोखमीचे १३१ पाणीस्त्रोत

By विजय सरवदे | Published: June 13, 2024 12:06 PM2024-06-13T12:06:20+5:302024-06-13T12:06:43+5:30

पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथरोगाची लागण पसरू नये म्हणून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने संबंधित विभाग व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

risk of waterborne disease; 131 water bodies of moderate risk in Chhatrapati Sambhajinagar district | जलजन्य आजाराचा धोका; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम जोखमीचे १३१ पाणीस्त्रोत

जलजन्य आजाराचा धोका; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम जोखमीचे १३१ पाणीस्त्रोत

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाण्याचे बहुतांश स्त्रोत कोरडे पडले होते. पावसाळ्यात ते दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने २ हजार ९७८ जलस्त्रोतांच्या नमुन्यांची मान्सूनपूर्व तपासणी केली. त्यानुसार जिल्ह्यात कुठेही दूषित पाणीस्त्रोत आढळून आले नसले तरी मध्यम जोखमीचे १३१ पाणीस्त्रोत आढळून आले आहेत. अशा ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाने पिवळे कार्ड दिले आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत १ ते ३० एप्रिल दरम्यान, जिल्ह्यातील ८६४ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नळ पाणीपुरवठा, हातपंप, विहिरी आदी २ हजार ९७८ जलस्त्रोतांच्या नमुन्यांची मान्सूनपूर्व तपासणी करण्यात आली. या नमुन्यांची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत करण्यात आली असून, प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७३३ ग्रामपंचायतींना स्वच्छ पाणीपुरवठ्याबद्दल हिरवे कार्ड देण्यात आले. प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालात जिल्ह्यातील एकही जलस्त्रोत जोखमीचा अर्थात दूषित नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे यंदा एकाही ग्रामपंचायतीला लाल रंगाचे कार्ड देण्यात आलेले नाही. मात्र, पाणीस्त्रोतांजवळ असणारे सांडपाणी जे पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामध्ये झिरपण्याची शक्यता आहे, असे मध्यम जोखमीचे जिल्ह्यात १३१ पाणीस्त्रोत आढळून आले असून, त्याकडे आरोग्य विभागाने पिवळ्या कार्डच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथरोगाची लागण पसरू नये म्हणून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने संबंधित विभाग व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी ३३ टक्के क्लोरिन असलेली ब्लिचिंग पावडर, तुरटी, सोडियम हायपोक्लोराइट आदी रसायनांचा वापर करावा. जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, सुरक्षित पाणी मिळण्यासाठी जुनाट किंवा गंजलेली पाइपलाइन, गटारीखालून जाणाऱ्या जलवाहिन्यांची नियमित तपासणी करावी, त्यामध्ये गळती असल्यास ती त्वरित दुरुस्ती करावी, दर तीन महिन्यांतून एकदा पाण्याच्या टाकीची स्वच्छता करावी, याकडेही सर्व ग्रामपंचायतींचे लक्ष वेधले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी
तालुका- स्त्रोत- पिवळे कार्ड- हिरवे कार्ड
छत्रपती संभाजीनगर- ४१७- १४- १००
फुलंब्री- २३८- ५- ६६
सिल्लोड- २७७- १६- ८७
सोयगाव- २३९- २- ४४
कन्नड- ४८८- २७- १११
खुलताबाद- २२२- ११- २८
गंगापूर- ३०७- १२- ९८
वैजापूर- ३३२- ८- १२७
पैठण- ४५८- ३६- ७२

Web Title: risk of waterborne disease; 131 water bodies of moderate risk in Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.