खरीखुरी झाली रितेश-जेनिलियांची रुपेरी पडद्यावरची प्रेमकहाणी !
By Admin | Published: February 14, 2016 12:03 AM2016-02-14T00:03:15+5:302016-02-14T00:10:06+5:30
दत्ता थोरे , लातूर हिंदी चित्रपटाच्या पडद्यावरची रोमँटिक जोडी म्हणजे लातूरचे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख होत. पडद्यावर प्रेमकहाणी साकारताना एकमेकांच्या प्रेमात
दत्ता थोरे , लातूर
हिंदी चित्रपटाच्या पडद्यावरची रोमँटिक जोडी म्हणजे लातूरचे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख होत. पडद्यावर प्रेमकहाणी साकारताना एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या जोडीने खऱ्याखऱ्या आयुष्यातही आपली प्रेमकहाणी फुलविली. लातूरच काय अगदी हिंदी चित्रपटसृष्टीतही आयडियल ठरलेल्या या जोडप्यांची प्रेमकहाणी चित्रपटाहून रोमँटीक ठरली आहे. व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर नेटवर अनेक प्रेमवीरांनी यांच्या प्रेमकहाणींची पाने चाळून पाहली आहेत. विशेष म्हणजे या जोडप्याने एकमेकांच्या प्रेमकहाणीला मुलाखतीतून जगासमोर आणले असून युट्युबवर असलेल्या या मुलाखतींना शेकडो तरुणांनी पाहिले आणि ऐकले आहे. आज ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त या आदर्श जोडीच्या प्रेमकहाणीची ही क्षणचित्रे खास लातूरच्या वाचकांसाठी.
ते साल होतं. २००२. हिंदी चित्रपटसृष्टीत रितेश देशमुख यांनी आपले चांगलेच बस्तान बसविले होते. लातूरसारख्या गावातून आणि एका राजकीय वारसा असताना चित्रपटासारख्या क्षेत्रात त्यांनी आघाडीचे नायक म्हणून पाय रोवणे सुरु केले होते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटांसाठी त्यांना साईन केले होते. अभिनेत्री कोण ? हे त्यांना माहित नव्हते. चौकशी केल्यावर कळाले की जेनेलिया डिसूजा नावाच्या अभिनेत्रींना साईन केले असल्याचे समजले. चित्रपटाचे शुटींग हैदराबादला होणार होते. अभिनेत्री आपल्या आईसह असून तिथेच हैदराबाद विमानतळावर आपणास भेटणार असल्याचे सांगितले गेले. रितेशजी तिथे गेले आणि जेनेलिया यांना भेटले. ही त्यांची एकमेकांची पहिली भेट. अवघे सोळा साडेसोळा वय असलेल्या जेनेलिया खरोखर आपल्या आईबरोबर आल्या होत्या. या भेटीत रितेशजी जेनेलियापेक्षा त्यांच्या आईशीच जास्त गप्पा मारत होते. कारण जेनेलिया यांचा आधीच लाजाळू स्वभाव शिवाय ‘अभिनेते रितेश’ यांच्यापेक्षाही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत, याचेच दडपण जास्त होते. त्यामुळे त्या मुद्दामहून हटकून लांब रहात होत्या. परंतु शुटींगच्या दरम्यान त्यांच्या मनातील सारे समज गळून पडले. वडील मुख्यमंत्री असतानाही रितेश यांच्यातील विनम्रताच त्यांना अधिक आवडून गेली आणि पडद्यावरची ही जोडी खासगी आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडली. २००३ ते २०१२ पर्यंत यांच्यातील प्रेमकहाणी फुलली आणि साता जन्माच्या आणाभाका घेत सप्तपदी घेऊनच थांबली. ही प्रेमकहाणी हिंदी चित्रपटसृष्टीतही सर्वाधिक हिट ठरली़ त्यांच्या विवाह सोहळ्याला लातूरच काय अवघी चित्रपटसृष्टी आणि देशातील राजकारणी हजर होती़