दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा उपाय; २ योजनांसाठी १० हजार कोटींचे प्रस्ताव
By बापू सोळुंके | Published: June 1, 2024 05:52 PM2024-06-01T17:52:50+5:302024-06-01T17:54:31+5:30
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दोन प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ही ओळख पुसून टाकण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सर्वमान्य झाले आहे. नदीजोड प्रकल्पाच्या दोन योजनांसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने १० हजार कोटींचे दोन प्रस्ताव तयार केले आहेत. हे प्रस्ताव आता तांत्रिक मान्यतेसाठी नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आले आहेत.
कायमस्वरूपी कमी पावसाचा प्रदेश म्हणून मराठवाड्याकडे पाहिले जाते. परिणामी एक, दोन वर्षांआड मराठवाड्यात भीषण पाण्याची टंचाई निर्माण होते. गाव, वाड्यांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा, टँकरवाडा अशी दूषणेही दिली जातात. कमी पावसामुळे राज्यातील अन्य प्रांतांच्या तुलनेत मराठवाड्यातील सिंचन क्षेत्रही कमी आहे. यावर नदीजोड प्रकल्प हाच एकमेव उपाय असल्याचे जलतज्ज्ञांनी शासनाला पटवून दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याात आणण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्देशाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दमणगंगा, वैतरणा गोदावरी, कदवा आणि दमणगंगा एकदरे गोदावरी या दोन नदीजोड प्रकल्पांचे प्रस्ताव तयार केले आहे. या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे महामंडळाने पाठविले आहेत. समितीची मान्यता मिळताच प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार असल्याचे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी सांगितले.
दोन्ही नदीजोड योजनांचे पाणी थेट गाेदावरीत सोडावे
नदीजोड दमणगंगा, वैतरणा गोदावरी, कदवा या नदीजोड योजनेचे पाणी सिन्नर एमआयडीसीला देण्यात येणार आहे. शिवाय सिन्नर तालुक्यातील २१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार आहे, तर दमणगंगा, एकदरे, गोदावरी या नदीजोड योजनेचे पाणी नाशिकजवळील वाघाड धरणांत टाकणार आहे. हे दोन्ही प्रकल्प मराठवाड्यासाठी असल्याचे सांगून मंजूर करीत आहात, मात्र दोन्ही नदीजोड प्रकल्पांचे पाणी मराठवाड्याला मिळणार नसेल, तर हे प्रकल्प रद्द करा अन्यथा दोन्ही प्रकल्पांचे पाणी थेट गोदावरी नदीत सोडा, अशी आमची मागणी आहे.
- डॉ. शंकर नागरे, जलअभ्यासक, तथा माजी सदस्य मराठवाडा वैधानिक विकास मंडळ.