रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार?
By विकास राऊत | Published: December 23, 2022 12:06 PM2022-12-23T12:06:07+5:302022-12-23T12:07:16+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत.
औरंगाबाद : नोव्हेंबर २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींनी औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंत वाहनाने प्रवास केल्यानंतर त्या रस्त्याची दुरवस्था दूतावासाकडे अभिप्रायासह नोंदविली. आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील बांधकाम विभागाची लक्तरे टांगली गेली. १८२५ दिवसांपासून १४८ किमी रस्त्याचे काम सुरू आहे. जी-२० परिषदेनिमित्त येणारे पाहुणे अजिंठा लेण्यांना याच रस्त्याने जाणार असल्याने आता यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे.
रस्त्याचे अजूनही २० टक्के काम शिल्लक आहे. दोन वर्षांच्या कामाला पाच वर्षे लागत आहेत. २०१६ मध्ये २५ कोटींतून तात्पुरती डागडुजी करूनही या रस्त्याचे काम झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाने हर्सूल टी पॉइंटपासून रस्त्याची पाहणी करून आढावा घेतला. हर्सूल ते जुना जकात नाक्यादरम्यान अडथळे आहेत. ते काम तातडीने शक्य नसल्याचे बोलले जाते. हर्सूल रुंदीकरणासाठी सोळा कोटींचा निधी अद्याप मिळालेला नाही. जी-२० पूर्वी हा रस्ता रुंद होणे गरजेचे आहे.
पाच वर्षांपासून का लागले ग्रहण?
आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडून पोबारा केला. त्यानंतर तीन कंत्राटदारांना काम वाटून दिले. १ हजार कोटींची सुरुवातीची तरतूद होती. आता १५०० कोटींपर्यंत प्रकल्पाचा खर्च गेला. परिणामी, सिल्लोड बायपासचेही काम संथ सुरू आहे. काही ठिकाणी पुलांचे काम ठप्प आहे. निल्लोड फाटा ते सिल्लोडदरम्यान आठ किमी रस्त्याचे काम धुळे विभागाकडे आहे. ते खटोड कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आले. अद्याप कामाला गती नाही. अजिंठा लेण्यांमुळे पर्यटकांसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्ग महत्त्वाचा आहे. दीड हजार कोटी रुपये खर्चाचा काँक्रिट रस्ता पाच वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. हर्सूल टी पॉईंटसह पुढे रुंदीकरण व अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, चौका, बिल्डा, सिल्लोडपर्यंत कामे सुरू आहेत. अजिंठा घाटात संरक्षण कठडे व रस्ता बांधण्याचे काम प्रलंबित आहे.
प्रशासनाच्या बैठकीत काय ठरले?
१४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला आदेश दिले. सिल्लोड ते फर्दापूर रस्त्याच्या कामास २० डिसेंबरपासून सुरुवात करावी. औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंत ६ ठिकाणची कामे पूर्ण करावीत, चौका घाटातील रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव मान्य झाला आहे, फुलंब्री येथील रस्त्यावरील काँक्रिटचे काम पूर्ण करावे, रस्त्यांवर जी-२०च्या अनुषंगाने वाहतूक नियम सूचनाफलक रेडियमसह लावणे, ३० डिसेंबरपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करावीत, आदी निर्देश आहेत.