अडीच कोटी खर्चून केलेल्या आझाद चौक ते रोशनगेट रस्त्याचा वापर वाहनतळ म्हणूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:32 PM2020-11-25T17:32:36+5:302020-11-25T17:37:07+5:30
अडीच कोटी रुपये खर्च करूनही रोशनगेटपर्यंत २०० फूट रस्त्याचे काम शिल्लक राहिलेले आहे.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : सिडको- हडकोतील नागरिकांना जुन्या शहरात येण्या- जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आझाद चौक ते रोशनगेट होय. चार वर्षांपूर्वी महापालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करून हा सिमेंट रस्ता तयार केला; परंतु सध्या या रस्त्याचा वापर निव्वळ वाहनतळ म्हणून केला जातोय. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होतो. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली; पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.
आझाद चौक ते रोशनगेटपर्यंत डीपी रोडची अवस्था वाईट होती. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेसमोर आंदोलने केली. त्यामुळे महापालिकेने निधी नसतानाही दोन टप्प्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण केले. पहिल्या टप्प्यात दीड कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला; परंतु काम पूर्ण होत नसल्यामुळे आणखी एक कोटी रुपये देण्यात आले. अडीच कोटी रुपये खर्च करूनही रोशनगेटपर्यंत २०० फूट रस्त्याचे काम शिल्लक राहिलेले आहे. याचा नागरिकांना त्रास होतोय.
रस्त्याच्या मध्यभागी पार्किंग
किराडपुऱ्यातील राममंदिरापासून दरबार हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मध्यभागी मोठमोठी चारचाकी वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे रस्त्याचा वापर पाच ते सात फुटांपर्यंत सीमित होतो. त्यातून दुचाकी आणि रिक्षा ये-जा करता येऊ शकतात; पण चारचाकी वाहनधारकांना येथून मार्ग काढताना कसरत करावी लागते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे
रोशनगेटपासून पुढे काही अंतरावर सिमेंट रस्ता सुरू होतो. पुढे आझाद चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे झाली आहेत. छोट्या हॉटेलसमोरील वाहने तर थेट रस्त्यावरच उभी राहतात. वाहतूक पोलीस आणि महापालिकेने दोन ते तीन वेळेस कारवाई केली. त्यानंतर ही परिस्थिती जैसे थे आहे.
- खर्च २ कोटी ५० लाख ८१ हजार
- रस्त्याची लांबी ०.५ किलोमीटर
- रस्त्याची रुंदी ७ मीटर