सिडकोकडून रस्ते कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:39 PM2019-07-02T22:39:35+5:302019-07-02T22:39:48+5:30
सिडको वाळूज महानगरातील नियोजित क्षेत्रातील विकासकामे प्रशासनाने हाती घेतले असून, मंगळवारी गट नंबर ४ व १४ मधील रस्त्याचे मार्किंग करण्यात आले.
वाळूज महानगर: सिडकोवाळूज महानगरातील नियोजित क्षेत्रातील विकासकामे प्रशासनाने हाती घेतले असून, मंगळवारी गट नंबर ४ व १४ मधील रस्त्याचे मार्किंग करण्यात आले.
सिडको वाळूज महानगरातील फेज १, फेज २ व फेज ४ च्या सिडको नियोजित क्षेत्राचा विकास करण्या संदर्भात मागील महिन्यात मुख्य प्रशासक मधुरकरराजे आर्दड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत फेज १ मधील वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ४ व १४ मधील नियोजित क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्य प्रशासक आर्दड यांच्या आदेशानुसार प्रशासकीय स्तरावर गट नंबर ४ व १४ मधील विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या भूखंडावर प्रशासनाकडून वडगाव-तीसगाव या मुख्य रस्त्यापासून १५ मीटर रुंद व १५० मीटर लांब असे दोन मुख्य रस्ते तयार करण्यात येणार आहेत. तसेच ९ मीटर रुंद व ६०० मीटर लांबीचे ५ अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहेत.
मंगळवारी मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे, अभियंता उदयराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात नियोजित रस्ते कामाची मार्किंग करण्यात आली. यावेळी सिडकोचे किशोर बनसोडे, संतोष निकाळजे, विकास पवार, तारामती भिसे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फौजदार राजेंद्र बांगर, पोहेकाँ. कय्युम पठाण, संदीप धनेधर, किशोर मुळवंडे आदींची उपस्थिती होती.