रविवारीही वाहतुकीचा बोजवारा
By Admin | Published: July 17, 2017 12:58 AM2017-07-17T00:58:38+5:302017-07-17T00:59:50+5:30
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तर थेट नगरनाक्यापर्यंत पुन्हा एकदा दिवसभर वाहनधारकांना वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ कसा सुरू आहे, याचा प्रत्यय आला.
रविवारी सुटीचा दिवस...त्यात आभाळ भरून आलेले...अधूनमधून मंद पावसाच्या सरी कोसळत असताना हजारो औरंगाबादकरांनी दौलताबाद, खुलताबाद आणि म्हैसमाळला जाण्याचा बेत आखला. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तर थेट नगरनाक्यापर्यंत पुन्हा एकदा दिवसभर वाहनधारकांना वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ कसा सुरू आहे, याचा प्रत्यय आला. जिकडे तिकडे वाहतूक कोंडी असताना प्रत्येक चौकात आठ ते दहा वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या नावाने ‘टार्गेट’करीत होते. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे बळ नसते. वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी चौकाचौकांत उभे राहणारे पोलीस ‘बळ’येते तरी कोठून, असा प्रश्न तमाम औरंगाबादकरांना पडला आहे.
जालना रोड म्हणजे स्मार्ट सिटीची लाईफ लाईन होय. एक दिवस संपूर्ण जालना रोड बंद ठेवायचा म्हटले तरी अशक्यप्राय बाब आहे. काही वर्षांपूर्वी एका सर्वेक्षणात निदर्शनास आले होते की, २४ तासांमध्ये जालना रोडवरून पाच लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. आता हे प्रमाण किंचित वाढले असेल असे आपण गृहीत धरू या...ज्या रस्त्यावर सहा लाख वाहने दररोज धावतात त्या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था कशी असायला हवी...राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये जालना रोडपेक्षाही मोठे रस्ते आहेत. तेथेही वाहतुकीचा ताण औरंगाबादपेक्षा कितीतरी जास्त आहे. तेथे असा सत्यानाश होत नाही.
रविवारी सुटीच्या मूडमध्ये घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना सेव्हन हिल, आकाशवाणी, अमरप्रीत, बाबा पेट्रोलपंप, नगरनाक्यापर्यंत वाहतूक कोंडीतून जावे लागले.