बीडमध्ये बांधकामात रस्ते ‘ढापले’ !
By Admin | Published: November 16, 2014 12:12 AM2014-11-16T00:12:43+5:302014-11-16T00:37:49+5:30
सोमनाथ खताळ , बीड शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अंतर्गत रस्त्यांचे होत असलेले अरूंदीकरण याला दुसरे तिसरे कोणी नाही तर पालिकाच जबाबदार आहे.
सोमनाथ खताळ , बीड
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अंतर्गत रस्त्यांचे होत असलेले अरूंदीकरण याला दुसरे तिसरे कोणी नाही तर पालिकाच जबाबदार आहे. संबंधीत विभागातील कर्मचाऱ्यांचे हात ओले करून बोगस बांधकाम परवाने मिळत रस्ते ढापण्याचा महाप्रताप बीडमध्ये सुरू आहे.
एकही रस्ता असा नाही की ज्याची रूंदी नियमाप्रमाणे आहे. प्रत्येक रस्ता हा अरूंद झाला आहे. रस्त्यांच्या जागेत बीडमधील अनेक महाभागांनी , दुकाने इमारती उभारल्या आहेत. पेठबीड भागात तर पालिकेतील अधिकाऱ्यांनी ‘हद्द’च पार केली आहे. बांधकामासाठी परवानगी दिली खरी मात्र, ते घर त्याच जागेत, तेवढ्याच हद्दीत बांधले जाते का? याची शहानिशा सुद्धा केली जात नाही. एकच नाही तर प्रत्येक मुख्य, गल्लीबोळातील रस्त्यांवर घरे बांधण्यात आलेली आहेत. यावर कारवाया करण्यास मात्र पालिकेतील अधिकारी, कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत आहेत. या अधिकाऱ्यांचे अभय असल्यामुळेच दिवसेंदिवस रस्ते अरूंद बनत चालले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ललीत अब्बड यांनी केला आहे. सुभाष रोडही अरूंद झाला आहे. या मुख्य रस्त्यावर अनाधिकृतपणे इमारती, दुकाने थाटले असून सध्या ते जोमात चालू आहेत.
पालिकेचे अभय असलेले उदाहरण
पेठ बीड भागातील हिरालाल चौकात संदीप रामदास दहिवाळ, रामदास श्रीराम दहिवाळ यांनी पालिकेकडून ९ जानेवारी २०१२ ला बांधकामासाठी परवानगी घेतली होती. २.३८ बाय २.८४ चौमी जागेत बांधकामासाठी मंजूरी देण्यात आली होती. त्याप्रमाणे नकाशाही पालिकेने तयार केला आहे. मात्र दहिवाळ हे जास्त जागेत बांधकाम करीत असल्याची तक्रार ललीत अब्बड यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे दिली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर रोजी प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ नुसार त्यांना नोटीसही पाठविण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये अनाधिकृतपणे बांधकाम चालू असल्याचे नमूद केले असून तात्काळ हे बांधकाम थांबवावे असे सांगण्यात आले आहे. मात्र, या नोटीसला केराची टोपली दाखवित हे बांधकाम अद्यापही सुरूच आहे.