आठ कोटी खर्चून केलेला रस्ताही खचला
By Admin | Published: August 5, 2014 11:49 PM2014-08-05T23:49:58+5:302014-08-05T23:59:53+5:30
कुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई -बोल्डा या रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले.
कुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई -बोल्डा या रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले. तब्बल आठ कोटी रुपयांचा त्यावर शासनाने पैसा खर्च करूनही तीन महिन्यांत रस्ता खचला असून अवस्था पूर्वीप्रमाणे झाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे मूल्यमापनदेखील झालेले नाही.
वाई- पांगरा शिंदे-बोल्डा या रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यांपूर्वी झाले होते. मोठ्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याचे डांबरीकरण झाले. परंतु कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनल्याची तक्रार आहे. रस्त्याला डांबर फासण्यात आल्याने जागोजागी रस्ता उखडण्यास सुरूवात झाली आहे. रस्त्यावरचे डांबर व गिट्टी रिमझिम पावसातही वाहून जात आहे. अद्याप मोठा पाऊस झाला नाही. अन्यथा रस्ता राहतो की नाही? असाही प्रश्न रस्ता त्याकडे पाहून पडतो. रस्त्याचे बाजूंची भर संपूर्णत: ढासळू लागले आहे. थातूरमातूर बाजू भर करण्यात आली. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट बनल्याने तीन महिन्यात या रस्त्याने तग धरलेला नाही. त्यामुळे भविष्यात रस्ता टिकणे अवघड झाले आहे. निकृष्ट कामाबरोबर काही ठिकाणी थोडेफार अंतर सोडून रस्ता करण्यात आला. रस्त्याच्या कामात धरसोड करण्यात आली. या कामाकडे बांधकाम विभागाने अद्याप लक्ष दिलेले नसून रस्त्याचे मुल्यमापन झालेले नाही. आठ कोटी रुपये खर्च करून रस्ता बांधण्यात आला; परंतु निकृष्ट कामामुळे रस्त्याची वाट लागल्याने रस्त्याला निव्वळ डांबर फासल्या गेल्याने शासनाचे पैसे पाण्यात गेल्याची स्थिती आहे.
सां.बा.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)