रस्ता उंच, मालमत्ता खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:02 AM2021-09-13T04:02:37+5:302021-09-13T04:02:37+5:30
औरंगाबाद : हनुमान चौक ते हायकोर्टाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील मालमत्ता रस्त्यापासून अडीच ते तीन फूट खाली गेल्याने पावसाचे पाणी ...
औरंगाबाद : हनुमान चौक ते हायकोर्टाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील मालमत्ता रस्त्यापासून अडीच ते तीन फूट खाली गेल्याने पावसाचे पाणी अनेक निवासस्थानांच्या आवारात साचते आहे. साईडड्रेन केल्या असल्या तरी त्यातून पुरेसे पाणी वाहून जात नसल्याचे मालमत्ताधारक सांगत आहेत.
खड्डा करतोय ट्रॅफिक जाम
औरंगाबाद : जालना रोडवरील हायकोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर अर्ध्या फुटापेक्षा खोलवर २० फुटँचा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यातून वाहने आदळत आहेत. सिग्नलपासून २०० मीटरच्या अंतरात असलेल्या या खड्ड्यामुळे प्रचंड वाहतूक खोळंबते आहे.
जयभवानीनगर रस्त्याचे काम ठप्प
औरंगाबाद : जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम ठप्प पडले आहे. एका बाजूचे काम अर्धवट झाले आहे; तर दुसऱ्या बाजूचे काम अद्याप सुरू होण्याची शक्यता नाही. त्यातच पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या रस्त्याचे काम तातडीने करण्याची नागरिकांची मागणी आहे.
फुलांना आला भाव
औरंगाबाद : महालक्ष्मीचे (गौरी गणपती) रविवारी आगमन झाले. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या फुलांना प्रचंड भाव आला होता. चमेलीची फुले १०० रुपयांत अडीचशे ग्राम विकली गेली; तर काही ठिकाणी झेंडूची फुले १०० रुपये किलो होती.
पुलाखाली पडले खड्डे
औरंगाबाद : वसंतराव नाईक चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल सिडको येथील पुलाखाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिग्नल सुटल्यानंतर वाहनचालकांना खड्ड्यांचे अडथळे पार करीत जावे लागते आहे.
स्मशानभूमीसमोरील गळती थांबेना
औरंगाबाद : मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोरच जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे रस्ता उखडत चालला असून तेथे मोठे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या पायथ्याशी हे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने जावे लागते.
सणासुदीत विजेचा लपंडाव
औरंगाबाद : सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे नागरिकांतून महावितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त होतो आहे. पुंडलिकनगर, गजानननगर, हनुमाननगर, परिजातनगर, एन-४ या भागांत रविवारी वारंवार वीजपुरवठा खंडित झाला.
भजन संध्याचे आयोजन
औरंगाबाद : दाधीच ब्राह्मण समाजातर्फे १३ व १४ सप्टेंबर रोजी भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्रसेन भवन पानदरिबा येथे १३ रोजी सायंकाळी ७ वाजता भजनसंध्या, तर १४ रोजी सकाळी ११ ते ४ या दरम्यान महाआरती, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
दमडी महल पुलाजवळील काम सुरू
औरंगाबाद : दमडी महल पुलाजवळील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम सुरू केल्यामुळे पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक नागरी वसाहतींमधून जात असल्याने रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
सुरक्षा भिंतीचा मलबा तसाच
औरंगाबाद : गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची सुरक्षा भिंत खचली असून त्याचा मलबा अजून तसाच पडून आहे. त्या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे भिंत लवकर बांधण्याची मागणी आहे.