व्हीआयपींसाठी रस्ता जॅम; खोळंबलेल्या वाहतुकीत पावसात भिजले नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:44 PM2024-09-25T18:44:30+5:302024-09-25T18:45:44+5:30

खोळंबलेल्या वाहतुकीमुळे नागरिकांना मनस्ताप; केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह १६ महत्त्वाचे नेते आल्याने पोलिसांची धांदल

Road jam for VIPs; Citizens drenched in the rain in the disrupted traffic | व्हीआयपींसाठी रस्ता जॅम; खोळंबलेल्या वाहतुकीत पावसात भिजले नागरिक

व्हीआयपींसाठी रस्ता जॅम; खोळंबलेल्या वाहतुकीत पावसात भिजले नागरिक

छत्रपती संभाजीनगर : दुपारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस, केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व डझनभर महत्त्वाचे नेते मंगळवारी शहरात आले. व्हीआयपी प्रोटोकाॅल व अरुंद रस्त्यावर खोळंबलेल्या वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांच्या वाट्याला मात्र मनस्ताप आला. सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत सेव्हन हिल्स ते चिकलठाणा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता.

सायंकाळी ७ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबत केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले. या वेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्वागत केले. या वेळी भाजपचे वरिष्ठ नेते देखील हजर होते. शहा यांचा ताफा निघण्याच्या १० मिनिटे आधीच ते सभास्थळी रवाना झाले.

व्हीआयपींसाठी पोलिस, नागरिक १५ मिनिटे पावसात भिजले
झेड प्लस सुरक्षेमुळे निवडक वरिष्ठ नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच आत प्रवेश होता. शहा यांचा ताफा थेट विमानतळाच्या आतील भागातून बाहेर पडला. जवळपास ४२ वाहनांचा ताफा निघण्याच्या दहा मिनिटे आधीच जालना रोड रिकामा करण्यात आला. त्याच वेळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दुचाकीस्वारांसह बंदोबस्तासाठी उभे पोलिस ओलेचिंब झाले. त्यानंतरही सेव्हन हिल्स ते चिकलठाणापर्यंत जालना रोड ठप्प झाला होता.

८.४० वाजता मुख्यमंत्री दाखल
व्हीआयीपींच्या दौऱ्यांमुळे पोलिस विभागाची एकच धांदल उडाली. सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात आले. त्याच्या दोन तासांनी शहा, तर ८.४० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावर पाेहोचले. शहा एमजीएमजवळ दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा पुन्हा चिकलठाणा विमानतळाकडे वळाला. परिणामी, शिंदे यांच्यासाठी पुन्हा वाहतूक थांबवण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

 

Web Title: Road jam for VIPs; Citizens drenched in the rain in the disrupted traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.