काटशेवरी फाटा ते गोळेगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:04 AM2021-07-15T04:04:36+5:302021-07-15T04:04:36+5:30
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहर जवळचे ठरणारा जटवाडा रोडवरील काटशेवरी फाटा ते गोळेगाव दरम्यान रस्त्याचे काम रखडल्याने ...
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहर जवळचे ठरणारा जटवाडा रोडवरील काटशेवरी फाटा ते गोळेगाव दरम्यान रस्त्याचे काम रखडल्याने हा रस्ता पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे. यामुळे अनेक छोटे,मोठे अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
काटशेवरी फाटा ते जटवाडा या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मात्र अद्याप काटशेवरी फाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी. रस्त्याचे गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल व पाणी साचत असल्याने वाहने फसत असून वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.
औरंगाबाद शहराला जोडणारा रस्ता असल्याने खुलताबाद तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी अशा सर्वांना सोयीचा ठरतो. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रास्ता रोको, धरणे आंदोलन केले होते. परिणामी हे काम सुरू झाले, मात्र काटशेवरी फाटा ते गोळेगावदरम्यान काम अर्धवट असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्याचे उर्वरित काम त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट
खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल
काटशेवरी फाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी. रस्ता अर्धवट अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी व चिखलामुळे वाहने फसून लोकांचे हाल होत आहे. त्यामुळे रस्त्याला परिसरातील लोक वैतागले आहेत. त्यामुळे सा.बा.ने हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा.
- गजानन साबळे, शेतकरी, शंकरपूरवाडी.
कोट.....
सा. बां. ने लक्ष देण्याची गरज
गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट सोडलेल्या या रस्त्यामुळे धुळीने लोक हैराण होते. आता पावसाळ्यात या रस्त्याची पार वाट लागली असून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सा. बां.ने लक्ष देऊन या रस्त्याचे काम हाती घेण्याची गरज आहे.
- प्रकाश पा. जाधव, शेतकरी, घोडेगाव.
फोटो कॅप्शन : काटशेवरी फाटा ते गोळेगाव या दोन कि. मी. रस्त्याची झालेली ही दयनीय अवस्था.