रस्ता चांगला नाही, खूप खड्डे आहेत; विभागीय आयुक्तजी लक्ष घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:16 AM2019-07-28T00:16:51+5:302019-07-28T00:16:59+5:30
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात येत असताना गाडी आदळून खूप धक्के बसत होते. रस्ता चांगला नसल्यामुळे हे झाले. शहरातील रस्ते बनविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षावजा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा विधि विद्यापीठाच्या कुलपती आर. बानुमथी यांनी व्यक्त केली. या सूचनेला प्रतिसाद देत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी समोरूनच होकार दर्शविला.
औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात येत असताना गाडी आदळून खूप धक्के बसत होते. रस्ता चांगला नसल्यामुळे हे झाले. शहरातील रस्ते बनविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षावजा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा विधि विद्यापीठाच्या कुलपती आर. बानुमथी यांनी व्यक्त केली. या सूचनेला प्रतिसाद देत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी समोरूनच होकार दर्शविला.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या इमारत भूमिपूजनासाठी न्यायमूर्ती आर. बानुमथी यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग, न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, खंडपीठातील न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला कांचनवाडी परिसरात आले होते. संभाजीराजे सैनिकी शाळेच्या बाजूलाच असलेल्या विधि विद्यापीठाच्या कार्यक्रमस्थळी जाताना पैठण रोडवरून आतमध्ये गेल्यास रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाचे पाणीही साचले होते. ही परिस्थिती पाहिल्यानंतर न्यायमूर्ती आर. बानुमथी यांनी मुख्य मार्गदर्शन करताना शेवटी खराब रस्त्याकडे लक्ष वेधले. येताना रस्त्यावर मोठे खड्डे असल्यामुळे गाडी आदळून धक्के बसत होते. राष्ट्रीय दर्जाची संस्था उभारणी करताना रस्ते चांगले असले पाहिजेत, त्याठिकाणी सतत विद्यार्थी येत असतात. त्यामुळे विभागीय आयुक्तजी आपण यात लक्ष घालावे. विधि विद्यापीठाकडे येणारा रस्ता चांगला करावा, अशी अपेक्षा जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली. यावर समोरच्या रांगेत बसलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही होकार दर्शविला.
विभागीय आयुक्तांची फोनाफोनी
जाहीर व्यासपीठावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी विधि विद्यापीठाकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली. यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वत:च्या जागेवरून उठून तात्काळ फोनाफोनी सुरू केली. तेव्हा उपस्थितांचे लक्ष विभागीय आयुक्तांकडे होते.