‘एसटी’ पॅकेज टूर्सच्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:03+5:302021-01-03T04:07:03+5:30
औरंगाबाद : खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी पॅकेज टूर्सच्या रस्त्यावर उतरली आहे. पर्यटन आणि देवदर्शनासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने ...
औरंगाबाद : खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी पॅकेज टूर्सच्या रस्त्यावर उतरली आहे. पर्यटन आणि देवदर्शनासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाची जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणीसाठी आतापर्यंत पर्यटन बसद्वारे सेवा दिली जात होती. पॅकेज टूर्सच्या माध्यमातून मध्यवर्ती बसस्थानकातून आता दर रविवारी अजिंठ्यासाठी निमआराम बस सोडण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी घृष्णेश्वर मंदिर (वेरुळ)- भद्रामारोती मंदिर (खुलताबाद)- म्हैसमाळ येथील बालाजी मंदिर, गिरीजादेवी मंदिर अशी साधी बस सोडण्यात येणार आहे. दर रविवारी आणि सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिर (नाशिक), वणी (सप्तशृंगी गड), घृष्णेश्वर मंदिर (वेरुळ) अशी निमआराम बस सोडण्यात येईल. तर दर रविवारी अष्टविनायक दर्शनासाठीही बस सोडण्यात येणार आहे.
पर्यटन आणि देवदर्शनासाठी जाण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु पैशांमुळे या प्रवासाचे गणित जुळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळ पॅकेज टूर्सद्वारे प्रवाशांना ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरसावली आहे.