६० लाख खर्चूनही रस्त्याची चाळण; व्हिआयपी रोडवरील खड्ड्यात मनसेने घातले अधिकाऱ्यांचे पित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 03:00 PM2021-10-06T15:00:24+5:302021-10-06T15:00:50+5:30
MNS Agitation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे पित्र पूजन आंदोलन केले.
औरंगाबाद: दोन महिन्यांपूर्वी जळगाव रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ६० लाख रुपये खर्च केले. नुकत्याच झालेल्या पावसात या व्हीआयपी रोडची खड्ड्यामुळे चाळण झाली. भ्रष्ट अधिकाऱ्यांची संवेदना मेल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज अधिकाऱ्यांच्या नावाने पित्र पूजन केले.
महिनाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव रोडची चाळणी झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे पित्र पूजन आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हातात खड्ड्यांचे फलक दाखवून, हीच का तुमची स्मार्ट सिटी, असा सवाल करीत आंदोलन केले. आठ दिवसांत हा व्हीआयपी रस्ता खड्डेमुक्त केला नाही, तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसविल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला. या आंदोलनात सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, अब्दूल रशीद खान, अशोक पवार पाटील, संतोष कुटे, नंदू नावपुते, अभय मांजरामकर,,गणेश साळुंके ,संदीप दांडगे, मनोज भिंगारे, राजू चव्हाण, बाबुराव जाधव, रुपेश शिंदे, चेतन पाटील, विशाल इराळे पाटील, प्रवीण मोहिते, राहुल कुलकर्णी, रवी गायकवाड, नितीन इंचुरकर, प्रशांत जोशी,कृष्णा घायट पाटील आदिंनी सहभाग नोंदविला.
आंदोलनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
आंदोलक अचानक रास्ता रोको करण्याची शक्यता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरिक्षक संभाजी पवार, पोलीस निरीक्षक विनोद सलागरकर, कैलाश देशमाने, एपीआय श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, महादेव गायकवाड हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनापूर्वी हजर होते.
मोठी बातमी ! कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध