वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम संथगतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 09:43 PM2019-02-21T21:43:20+5:302019-02-21T21:43:25+5:30
पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होत आहे.
वाळूज महानगर : वाळूज-कमळापूर या रस्त्यावर खडी व डब्बर टाकण्यात आला असून, याचे काम संथगतीने सुरु आहे. या कामामुळे या मार्गावरील वाहतूक आठवड्यापासून बंद करण्यात आली आहे. पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाळूज ते कमळापूर या रस्त्याचे काम आठ दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले आहे. ठेकेदाराने रस्त्यावर खडी व डब्बर टाकून रस्त्याच्या कामाला सुरवात केली आहे. एका बाजूने रस्त्याचे काम न करता दोन्ही बाजुने रस्त्यावर खडी व डब्बर अंथरल्यामुळे हा रस्ता आठवडाभरापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या या रस्त्याचे काम संथगतीने सुरु असून, रस्त्यावरील खडी व डब्बरमुळे साठेनगर, अजवानगर, रामराई, शिवाजीनगर, दत्तनगर, कमळापूर, रांजणगाव या भागातील नागरिक व वाहनधारकांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागत आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने एका बाजुने रस्त्याचे काम करण्यात येईल व रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजुने काम करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण रस्त्यावर खडी व डब्बर अंथरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
या रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे ग्रामपंचायतीकडून बजाज आॅटो कंपनीचा ट्रक टर्मिनलमधील रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी पत्रही देण्यात आले. मात्र, कंपनीकडून केवळ स्कूलबससाठी रस्ता खुला करण्यात आल्याने इतर वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची उच्च पदस्थ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.