मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर रास्तारोको; वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:26 PM2024-02-15T12:26:32+5:302024-02-15T12:27:06+5:30
फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात मनोज जरांगे यांच्या समर्थानात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे
फुलंब्री: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद गावाजवळ आज सकाळी ११ वाजेपासून मनोज जरांगे यांच्या समर्थनात रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून शेकडो वाहने अडकली आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असून जरांगे यांची प्रकृती खालावत जात असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सकाळी अकरा वाजता फुलंब्री तालुक्यातील आळंद गावाजवळ छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग बंद केला. आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करत असून मनोज जरांगे यांच्या समर्थानात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. या रास्तारोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. दरम्यान, वडोद बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.