देगावचाळ प्रभागात रस्ते, नाल्या झाल्या चकाचक
By Admin | Published: June 2, 2016 11:13 PM2016-06-02T23:13:02+5:302016-06-02T23:24:15+5:30
नांदेड शहरातील देगावचाळ प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते,नाल्या, ड्रेनेजसह अनेक पायाभूत सुविधांची कामे झाल्यामुळे याभागात ९० टक्के विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत
नांदेड शहरातील देगावचाळ प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ते,नाल्या, ड्रेनेजसह अनेक पायाभूत सुविधांची कामे झाल्यामुळे याभागात ९० टक्के विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत. प्रभागात देगावचाळ, नल्लागुट्टाचाळ, गोलचाळ, गंगाचाळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, बोरबन, भिमघाट व पक्कीचाळ आदी भाग येतात. एकेकाळी या भागात कोणत्याच पायाभूत सुविधांची कामे झालेली नव्हती, मात्र गेल्या काही वर्षामध्ये या प्रभागातील नगरसेवक गणेश धबाले यांच्या प्रयत्नामुळे अनेक कामे मार्गी लागली आहेत. भागातील एकही रस्ता कच्चा नाही, तसेच नाल्यांचीही नियमित सफाई होत असल्याने ड्रेनेजची कोणतीही समस्या नाही. याशिवाय सर्वच धर्मियांची समाजमंदिरे बांधून त्यांचे कंपाऊंडही बांधण्यात आलेली आहेत. या प्रभागात मुलभूत कामे सर्व झाली आहेत. मात्र सद्यस्थितीला प्रभागातील अनेक बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
खा़चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शन आणि प्रयत्नामुळे देगावचाळ प्रभागात कोट्यावधी रुपयांची विकासकामे करता आली. प्रभागातील व्हिक्टोरिया भागात नळाचे पाणी जात नसल्याने येथे डबल पाईपलाईन केली आहे. येथील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी एकाच दिवसात ५० ते ६० अनधिकृत नळकनेक्शन बंद केले आहेत. विहाराचे काम पूर्ण केले आहे. तसेच दत्त मंदिराचे बांधकाम केले असून या भागातील १५० मीटर सिमेंट रस्त्याचे काम लवकरच होईल. तसेच भीमघाट येथे ७५ लाखांचे काम सुरु केले आहे. या भागातील सर्व सिमेंट रस्त्याची कामे पूर्ण केलेली आहेत. शिवाय ड्रेनेज आणि नाल्यांची कामेही पूर्ण झालेली आहेत. नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात येते. नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे या भागातील बकरी मार्केट हाटवून त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यात आले आहे. विकासाची जवळपास ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी बोअरचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे उद्यापासून ज्या भागात पाणी जास्त येत नाही, त्या ठिकाणी टँकर सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोकळ््या जागेचे नाहरकरत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे येथे दवाखाना, वाचनालय आणि व्यायामशाळा बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मात्र त्यासाठीही खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करु.- विलास धबाले, शहर उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, नांदेड.
गणेश धबाले- नगरसेवक
वार्डात स्वेच्छा निधीतून क्लब हाऊस ते डंकीनकडे जाणारा रस्ता, बीआरजीएफ अंतर्गत स्मशानभूमीची सुरक्षा भिंतीचे बांधकाम,क्लॅब हाऊस कडे जाणारा सिमेंट रस्ता,दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत भीमघाट येथे सिमेंट रस्ता, बोरबन भागात सीसी रोड, गंगाचाळ ते भीमघाट येथे भूमिगत गटार लाईन टाकणे आदी एक ते दीड कोटींची कामे प्रस्तावित आहेत. तर दलित वस्ती सुधार योजना व खासदार निधीतून विविध स्वरुपाची जवळपास ६ कोटींची कामे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
२०० कोटी रुपयांची घरकुल योजना माजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झाली होती. मात्र या भागातील जागा गुरुद्वारा बोर्डाची असल्याने सदर जागेचे महापालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जागेअभावी २०० कोटी रुपयांची घरकुल योजना परत गेल्याचे नगरसेवक गणेश धबाले यांनी सांगितले. जागा उपलब्धतेसाठी पाठपुरावा करु असेही त्यांनी सांगितले.