जणू खेडेगावच असलेल्या राजनगरात चकाचक रस्ता

By Admin | Published: July 16, 2014 01:14 AM2014-07-16T01:14:31+5:302014-07-16T01:31:00+5:30

औरंगाबाद : वॉर्ड क्र. ८१, जयभवानीनगर येथील निर्मलनगर- राजनगर येथे राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या चकाचक रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला

Like the roads of Chakacha in the village of Khedgaon | जणू खेडेगावच असलेल्या राजनगरात चकाचक रस्ता

जणू खेडेगावच असलेल्या राजनगरात चकाचक रस्ता

googlenewsNext

औरंगाबाद : जणू खेडेगावच असलेल्या वॉर्ड क्र. ८१, जयभवानीनगर येथील निर्मलनगर- राजनगर येथे औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या चकाचक रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडे असलेला हा भाग शहराचा आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी परिस्थिती येथे होती. ना महापालिकेचे लक्ष, ना अन्य कुठल्या लोकप्रतिनिधीचे लक्ष. नगरसेवकांना तर आम्ही कधी पाहिलेही नाही, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदविली. अशा या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार व त्यांच्या खरोखरच गरजेनुसार राजेंद्र दर्डा यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि हा रस्ता तयारही करून दिला. याबद्दलची कृतज्ञता येथील नागरिक व्यक्त करताना दिसत होते.
तसेच गणेशनगर, विश्रांतीनगर येथील खडीकरण करण्यात आलेल्या चार वेगवेगळ्या रस्त्यांचे उद्घाटनही राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दर्डा यांचे हृद्य स्वागत करण्यात आले. आ. सुभाष झांबड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विश्रांती चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकादरम्यानच्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आल्यामुळे आता यापुढे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही. ओबडधोबड असलेल्या या रस्त्यावर पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत पाणी साचत असे. चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून पडत असत. चारचाकी तर पुढे जाऊच शकत नव्हती. खडीकरणामुळे हा रस्ता गुळगुळीत झाला आहे. या रस्त्यामुळे विश्रांतीनगरमधील ८ ते १० गल्ल्या जोडल्या गेल्या आहेत.
वॉर्ड क्र. ८२, भारतनगरमधील गणेशनगरच्या रहिवाशांच्या मागणीची दखल घेत अहिल्यादेवी होळकर चौक ते विश्वकर्मा मंगल कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरणाचे काम राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून करण्यात आले. यावेळी येथील नागरिकांनी फटाके फोडून व फटाक्यांची आतषबाजी करून राजेंद्र दर्डा यांचे जल्लोषात स्वागत केले. वॉर्ड क्र. ८२ मधील गणेशनगरातील सावित्रीबाई फुले चौक ते स्वामी समर्थनगर गणेशनगरमधील गल्लीतील खडीकरणाचे कामही पूर्ण करण्यात आले.
गणेशनगर ते विश्रांतीनगर, गल्ली नं. १ आणि २ मधील अशोक गायकवाड यांच्या घरापासून ते कदम किराणा दुकानापर्यंतच्या गल्लीचे खडीकरणही करण्यात आले आहे. कधी कुणी ढुंकूनही न पाहिलेले हे भाग विकासापासून कोसो दूर आहेत. रस्त्यांची तर येथे प्रचंड दुर्दशा आहे. शिवाय इतर नागरी समस्यांनाही या भागातील नागरिक तोंड देताना दिसत आहेत. या विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने स्वत: राजेंद्र दर्डा हे या भागात आले असताना एकीकडे झालेल्या कामांबद्दल नागरिक आनंद व्यक्त करीत होते, तर दुसरीकडे समस्यांचा पाढा वाचत होते. यावरून महापालिकेच्या कामांचा मागमूसही इकडे जाणवला नाही.
या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे, भागवत भारती, कृउबाचे माजी सभापती पंकज फुलपगर, सिडको- हडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, शेख रहीम, संदीप शिंदे, सुभाष मघाडे, नारायण गवई, लक्ष्मण मोटे, भानुदास कोल्हे, कांताराव गिरी, दीपक सोनवणे, हरिबक्षी चव्हाण, गजानन केवट, आदीनाथ गायकवाड, समीर शेख, राजू जाधव, अजय चिंचोले, उमेश शेजाळ, सुमन तायडे, ज्योती काकडे, लक्ष्मी कुबेर, आशा वाघमारे, कमल पळसकर, कुसुम आधोडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
राजनगर येथील कार्यक्रमास राजू वळेकर, आशाबाई पवार, कौशल्याबाई खांडेकर, उषाबाई तायडे, चंद्रकलाबाई काळे, प्रतिभा जाधव, चांगुणाबाई भुताळे, अलकाबाई पांढरे, संगीताबाई वाघमोडे, निर्मला राठोड, रेखाबाई थिटे, प्रवीण तायडे, बाबासाहेब करनोळ, भीमराव मेरगळ, संभाजी थोरात, मच्छिंद्र पाटोळे, माधव चव्हाण, संदीप पारवे, प्रभाकर गायके आदींची उपस्थिती होती. नगरसेवक सुरेश इंगळे यांना रस्त्याच्या उद्घाटनाचा बहुमान देण्यात आला.

Web Title: Like the roads of Chakacha in the village of Khedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.