कुत्र्यांच्या भीतिपोटी चोरटे बदलतात रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:28 AM2018-11-29T00:28:14+5:302018-11-29T00:29:07+5:30
मोकाट कुत्रे कधी कोणावर हल्ला करतील याचा नेम नाही. विशेषत: अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोरून जात असेल, तर त्या व्यक्तीवर भुंकून अथवा रस्ता अडविल्याशिवाय कुत्रे थांबत नाहीत, याचा अनुभव चोरट्यांनाही येतो. चोरी, घरफोडीचे गुन्हे करताना अनेकदा कुत्र्यांना पाहून आम्हालाही रस्ता बदलावा लागतो, असे एका चोरट्याने सदर प्रतिनिधीला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
औरंगाबाद : मोकाट कुत्रे कधी कोणावर हल्ला करतील याचा नेम नाही. विशेषत: अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोरून जात असेल, तर त्या व्यक्तीवर भुंकून अथवा रस्ता अडविल्याशिवाय कुत्रे थांबत नाहीत, याचा अनुभव चोरट्यांनाही येतो. चोरी, घरफोडीचे गुन्हे करताना अनेकदा कुत्र्यांना पाहून आम्हालाही रस्ता बदलावा लागतो, असे एका चोरट्याने सदर प्रतिनिधीला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मोकाट कुत्र्यांनी लचका तोडल्याने दहावर्षीय मुलाचा मंगळवारी अंत झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली. गुन्हेगारी विश्व सोडल्याचे सांगणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका अट्टल चोरट्याने सांगितले की, ज्या घरमालकाने कुत्रा पाळलेला आहे, अशा ठिकाणी चोरी करण्याचे साधारणत: टाळले जाते. बाहेरगावी जाणारे घरमालक बºयाचदा त्यांच्या बंगल्याच्या आवारात कुत्रा मोकळा सोडतात. असे कुत्रे अनोळखी व्यक्तीला बंगल्याच्या आसपासही फिरकू देत नाहीत. यामुळे अशा बंगल्यात चोरी करण्याचे धाडस चोरटे करीत नाहीत. चोरी करताना कोणतीही दुखापत होणार नाही आणि पकडले जाणार नाही, याची खात्री झाल्यानंतरच चोर चोरी करतो. पाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे मोकाट कुत्रे रात्री साडेअकरानंतर जास्त सक्रिय होतात. काही कुत्रे झुंडीने राहतात. दुचाकीस्वारांच्या मागे लागून त्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कुत्रे नसलेल्या मार्गाने रात्री चोरटे ये-जा करीत असतात, असेही तो म्हणाला.
कुत्र्यांना ब्रेड अथवा मांस खाऊ घालण्याचा प्रयत्न
अंगावर येणाºया कुत्र्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी बºयाचदा काही चोरटे कुत्र्यांना आपले करण्याचा प्रयत्न करतात. त्याकरिता ते ब्रेड, बिस्कीट आणि मांसाचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालतात. खाऊ घालणाºयांना कुत्रे त्रास देत नाहीत. यामुळे चोरटे त्यांचे काम करून निघून जातात.