देवगडकडे जाणारे रस्ते दोन दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:04 AM2020-12-29T04:04:31+5:302020-12-29T04:04:31+5:30
दर्शन घेण्याचे आवाहन गंगापूर : श्री. क्षेत्र देवगड येथे दत्त जयंतीनिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी दि.२९ व ३० डिसेंबरला दोन ...
दर्शन घेण्याचे आवाहन
गंगापूर : श्री. क्षेत्र देवगड येथे दत्त जयंतीनिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी दि.२९ व ३० डिसेंबरला दोन दिवस देवगडकडे जाणारे रस्ते बंद राहणार आहेत, अशी माहिती दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रमांवर शासनाकडून निर्बंध घातले आहेत. त्या दृष्टीने कार्यकारी मंडळ, तसेच भक्तगणांशी चर्चा करून यावर्षी संपन्न होणारा भगवान दत्तात्रोयांचा जन्मसोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतलेला आहे.
त्यानुसार मंगळवारी (दि. २९) सकाळपासून ते बुधवार (दि. ३०) सायंकाळपर्यंत प्रवरासंगम, देवगड फाटा व नेवासा येथून श्री क्षेत्र देवगडकडे येणारे रस्ते बंद केले जाणार आहेत. देवगड येथील स्वागतद्वार पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले आहे. दत्त जन्मसोहळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिनी व फेसबबुकद्वारा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.