वैजापुरातील रस्त्यांचे रुपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:09 AM2018-06-06T00:09:16+5:302018-06-06T00:09:20+5:30
निविदा प्रक्रिया पूर्ण : नाशिक -निर्मल रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर
मोबीन खान
वैजापूर : नाशिक -निर्मल रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने वैजापूर शहरातील रस्त्यांचे रुपडे पालटणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करावे, ही शहरवासियांची बऱ्याच वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे.
शहरातून जाणाºया नाशिक -निर्मल राज्य रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले असून शिऊर ते वैजापूर येवला हद्दीपर्यंतच्या २९ कि.मी. रस्त्याचे सिमेंट बांधकाम करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या १२३ कोटी रुपये खर्चाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर बांधकाम कंपनीमार्फत साधारणपणे एक महिन्यात या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता रामदास खलसे यांनी दिली.
सध्याच्या साडेपाच मीटरवरुन हा रस्ता दहा मीटर रुंद होणार असून संपूर्ण रस्ता सिमेंट कॉक्रीटचा असणार आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी अतिक्रमण काढून डांबरीकरण केलेला डॉ. आंबेडकर पुतळा ते औरंगाबादकडे जाणाºया चौपदरी रस्त्याचे रुप पालटणार आहे. याशिवाय डॉ. आंबेडकर पुतळा ते येवल्याकडे जाणाºया अरुंद रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. सध्या रस्त्याच्या कामासाठी सर्वेक्षण करण्यात येत असून रुंदीकरणाच्या कामासाठी सार्वजनिक विभागाला गरज पडल्यास येवला रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करावी लागणार आहे. हा रस्ता दुभाजक, फुटपाथ, साईड पंखे, गटारसह जवळपास २० ते २२ मीटर रुंदीचा असणार आहे. वैजापूर शहरातून जाणाºया नाशिक -निर्मल राज्य रस्त्याचे काही वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकर चौकापर्यंत अतिक्रमण काढून रुंदीकरण करण्यात आले होते. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला पन्नास फुट असा शंभर फुट रुंदीचा रस्ता बांधण्यात आला आहे. त्यानंतर गंगापूर रस्त्याचे सुद्धा रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणाºया येवला रस्त्याचा अपवाद वगळता वैजापुरला जोडणारे सर्व राज्य रस्त्यांचे रुंदीकरण होऊन हे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत. मात्र येवला रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी शासनाकडे रुंदीकरणासाठी प्रस्ताव पाठवून अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली होती. गेल्या वर्षी शासनाने या रस्त्याचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ असे नामकरण केले आहे. आता या रस्त्याच्या कामासाठी स्टेट कन्स्ट्रक्शन व ए.आर. कन्स्ट्रक्शन या कंपनीला गुत्ता देण्यात आला असून कार्यारंभ आदेश झाल्यानंतर एक महिन्याच्या आत या रस्त्याचे काम सुरु होणार आहे. शहराच्या हद्दीत दहा मीटर रुंदीचा चौपदरी रस्ता, दीड मीटरचे रस्ता दुभाजक, दोन्ही बाजुला दोन मीटरचे फुटपाथ, गटार, भराव असे जवळपास २२ मीटरचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणार आहे. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून वैभवात भर पडणार आहे. दोन वर्षात या २९ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता रामदास खलसे यांनी दिली.
जागो जागी फलक लावणे सुरु
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांनी या रस्त्याची पाहणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची लांबी, त्यावरील शासकीय मालमत्ता, फलक, झाडे यांची माहिती घेतली होती. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर आता जागो जागी राष्ट्रीय महामार्गाचे फलक लावणे सुरु आहे.
व्यावसायिकांचे धाबे दणाणले
शिऊर, कोल्ही, खंडाळा येथील व्यावसायिकांची दुकाने तसेच वैजापूर शहरातील रस्त्यावर छोट्या-मोठ्या टपºया टाकून दैनंदिन व्यवसाय करणाºया लोकांचे धाबे दणाणले आहे. आता आपल्या टपºया उठणार पण कुठून कुठे, किती फूट, कसा कसा रस्ता जाणार यावर चर्चांना उधाण आले आहे.