साधूच्या वेशातील लुटारूंनी निवृत्त अधिकाऱ्याच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:02 AM2021-02-06T04:02:26+5:302021-02-06T04:02:26+5:30
औरंगाबाद : एन-५ सिडको विजयश्री कॉलनीमध्ये सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ६९ वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोनसाखळी कारमधून आलेल्या ...
औरंगाबाद : एन-५ सिडको विजयश्री कॉलनीमध्ये सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ६९ वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोनसाखळी कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
सीपी यादव यांचा बंगला कुठे आहे, असे विचारत आरोपींनी त्यांच्याजवळ कार थांबविली. ते त्यांना पत्ता माहिती नाही, असे सांगत असताना कारमधील एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. यामुळे ते सुमारे ३० सेकंद कारमागे फरपटत गेले. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातून २०१२ साली निवृत्त झालेले विष्णू दौलत चित्ते (रा. बजरंग चौक परिसर, सिडको) हे दररोज सकाळी ७.४५ ते ८ वाजता फिरायला जातात. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले. चिश्तिया चौकमार्गे ते जळगाव रोडजवळील सर्व्हिस रोडने एन-७ कडे जात होते. विजयश्री कॉलनीमधून ते जात असताना अनोळखी पांढऱ्या कारमधून आलेल्या चार जणांपैकी चालकाजवळ बसलेल्या साधूच्या वेशातील एकाने त्यांना आवाज देऊन पोलीस कमिश्नर यादव कुठे राहतात, असे हिंदीतून विचारले. आपल्याला पत्ता माहिती नाही, असे चित्ते सांगू लागले असतानाच कारमध्ये समोरच्या सीटवर बसलेल्या साधूने त्यांना आवाज देऊन ऐकायला येत नाही, असे म्हणून जवळ बोलावले. चित्ते कारच्या खिडकीजवळ वाकून टीव्ही सेंटरकडून पुढे जा, असे त्यांना सांगत असताना आरोपीने अचानक त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेतली.
चौकट
खाली पडून जखमी
यावेळी चित्ते यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताच आरोपीने कारचा वेग वाढविला. चित्ते यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना सुमारे १० फुट फरपटत नेल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या पाय आणि हाताची कातडी सोलून गंभीर दुखापत झाली.
दुचाकीस्वाराने केला पाठलाग
यावेळी प्रत्यक्षदर्शींना असे वाटले की कारचालक वृद्धाला धक्का देऊन पळून जात आहे. यामुळे एका जणाने दुचाकीवरून आरोपीच्या कारचा पाठलाग केला. मात्र, चोरटे वाऱ्याच्या वेगाने तेथून पसार झाले.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
चित्ते यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणे आणि कारसोबत ते फरपटत जाण्याची सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. आरोपींनी कारच्या नंबर प्लेटवर काहीतरी लावल्याने कारचा नंबर दिसत नव्हता.
चौकट..
घरी जाऊन चित्ते यांनी त्यांच्या मुलीला सोबत घेऊन सिडको पोलीस ठाणे गाठले आणि झालेली घटना त्यांना सांगितली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याविषयी अनोळखी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी चित्ते यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलीस अधिकारी घटनास्थळी
या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, मनोज शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.