दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी वैजापुर पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 07:28 PM2018-03-27T19:28:03+5:302018-03-27T19:29:34+5:30
हरातील मुख्य बँकेतून ग्रामीण बॅंकेत रोकड घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत दबा धरून असलेल्या चौघांच्या टोळीस वैजापुर पोलिसांनि ताब्यात घेतले.
वैजापुर (औरंगाबाद) : शहरातील मुख्य बँकेतून ग्रामीण बॅंकेत रोकड घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत दबा धरून असलेल्या चौघांच्या टोळीस वैजापुर पोलिसांनि ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये आनंद छगन तांनसरे (वय ३१) श्रीरामपुर जि.अहमदनगर,नितिन नामदेव जाधव (३८) निमगाव ता.राहता जि.अहमदनगर, अमोल लक्ष्मण पारे (२४)कोपरगाव, गणेश अशोक शिंदे (२४) शिर्डी, यांचा समावेश आहे. यासोबतच दरोडेखोरांचा पाचवा साथीदार देवीदास जाधव हा (महालगाव, ता. वैजापुर ) येथील असून तो फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अहमदनगर पोलिसांनी काही दरोडेखोर तालुक्यात दरोड्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती वैजापूर पोलिसांना दिली. यावरून तपासात रोटेगाव येथील रेल्वेब्रिज खाली काही दरोडेखोर दबा धरून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांवर झडप घालत त्यांना जेरबंद केले. यावेळी दरोडेखोरांकडून दोन दुचाकी, एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, मिरचीची पूड व लोखंडी चाक़ू जप्त करण्यात आले. ही टोळी अहमदनगर जिल्यातील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून कोपरगाव, नगर, शिर्डी व राज्यातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या टोळीने वर्षभरापासून तालुक्यात धुमाकूळ घातला होता.