चालकास धमकावून कार पळविणारे दरोडेखोर २४ तासात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 07:55 PM2019-07-19T19:55:29+5:302019-07-19T20:00:55+5:30
आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
औरंगाबाद: पुणे येथे जायचे असल्याचे सांगून कारमध्ये बसलेल्या पाच जणांनी कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्यात कारचालकास धमकावत त्यांचे दोन मोबाईल,रोख दिड हजार रुपये आणि कार हिसकावून नेण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर अवघ्या २४ तासांत ग्रामीण पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली.त्यांनी लुटलेली कार, दोन मोबाईल जप्त केले. आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
अरविंद प्रेमचंद राठोड(रा.रिठ्ठी मोहडा), पंकज ब्रम्हदेव जाधव(गुदमातांडा)आणि संदीप शिवलाल राठोड(रा. मोहरड तांडा, ता. कन्नड)अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, बाबासाहेब साहेबराव शिंदे (रा. माऊलीनगर, हडपसर, पुणे) हे टॅक्सीचालक आहे. जस्ट डायल या संकेतस्थळावरून निकम नावाच्या व्यक्तीने पुणे येथे जाण्यासाठी कार बुकींग केल्याचा निरोप शिंदे यांना मिळाला. यामुळे १७ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिंदे हे वाळूज एमआयडीसीतील आंबेडकर चौकात गेले. तेथे त्यांना तीन अनोळखी व्यक्ती भेटले आणि कन्नड येथील दोन मित्रांना सोबत घेऊन पुणे येथे जायचे असल्याचे ते म्हणाले. यामुळे त्यांना कारमध्ये बसवून शिंदे हे कन्नड येथे गेले. तेथे अन्य दोन जणांना कारमध्ये बसविल्यानंतर सर्वांनी एका हॉटेलवर जेवण केले.
यावेळी त्यांनी सायगाव येथील कार्यालयातून काही सामान घ्यायचे असल्याचे सांगून त्यांनी कार गौताळा अभयाण्याकडे कार घेण्यास सांगितले. अभयारण्यातून कार जात असताना त्यांनी लघूशंकेसाठी कार थांबायला लावली. यानंतर सर्वांनी अचानक शिंदे यांना धमकावत त्यांचे दोन मोबाईल, दिड हजार रुपये आणि कारची चावी हिसकावून घेतली आणि त्यांना तेथेच सोडून आरोपी कार घेऊन पसार झाले. याघटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भागवत फुंदे आणि कर्मचाऱ्यांनी तपास केला तेव्हा आरोपी हे वडगांव कोल्हाटी येथे थांबल्याचे समजले. तेथून काही अंतरावर त्यांनी कार लपवून ठेवल्याचे दिसले. या कारच्या परिसरात १८ जुलै रोजी पोलिसांनी सापळा रचला तेव्हा सायंकाळी चार जण कारजवळ येताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली तेव्हा एक जण अंधारात पळून गेला. यावेळी पळविलेली कारसह दोन मोबाईल आणि दिड हजार रुपये पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस निरीक्षक फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, कर्मचारी झिया सय्यद, गणेश मुळे, बाळू पाथ्रीकर,नवनाथ कोल्हे,विक्रम देशमुख, संजय भोसले, शेख नदीम, राहुल पगारे, बाबासाहेब नवले,गणेश गांगवे, योगेश् ातरमाळे, नरेंद्र खंदारे, संजय तांदळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.