सिडकोत घरफोडीकरून २२ तोळे दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 10:36 AM2019-09-01T10:36:23+5:302019-09-01T10:40:54+5:30
बंद घर असल्याची संधी साधत चोरी
औरंगाबाद: सिडको एन ४ मधील गुरुसहानीनगरात घरफोडून सुमारे २२ तोळ्याचे दागिने आणि सात हजार रुपये चोरट्यानी पळविले .ही चोरी रविवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
वाळूज एमआयडीसी तील एका कंपनीत व्यवस्थापक असलेले शिवराम दास हे सिडको एन ४ मधील गुरुसहानीनगरात शिक्षिका पत्नी आणि मुलासह राहतात .२५ ऑगस्ट रोजी रात्री दास दांपत्य मुलासह ओरिसातील मूळ गावी कार्यक्रमासाठी गेले होते . गावी जाताना त्यांनी घराच्या मुख्य दाराला कुलूप लावले आणि बाहेरुन पडदा ओढून घेतला होता . तसेच गेटला कुलुप लावली होती . त्यांचे बंद घर चोरट्यानी पाहिले आणि दाराचा कोंडा तोडुन आत प्रवेश केला .
समोरच्या हॉल मधील टेबलाखाली उचकावल्यानंतर चोर वरच्या माळ्यावर गेले . तेथील बेडरूममधील कपाट उचकटून रोख सात हजार रुपये आणि सोन्याचे सुमारे २२ तोळ्याचे दागिन्यांची चोरुन पसार झाले . आज रविवारी सकाळी दास दांपत्य गावाहून औरंगाबादला परतले तेंव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले . या घटनेची माहिती पोलिसांना कळविली पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे , उपनिरीक्षक विकास खटके आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथकाला पाचारण केले .