पेट्रोल पंपाच्या मँनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रूपये लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 05:50 PM2021-07-22T17:50:07+5:302021-07-22T17:54:20+5:30
Verul Robbery Case : वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे मँनेजर अशोक गोपीनाथ काकडे हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शनिवार व रविवारची पेट्रोल पंपांचे जमा झालेले ५ लाख ३७ हजार रूपये बँकेत जमा करण्यासाठी मोटारसायकलवर जात होते.
खुलताबाद ( औरंगाबाद ) : वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या मँनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रूपये लंपास करणाऱ्या टोळीला खुलताबाद पोलीसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्याचा तपास ४८ तासात करत आरोपींच्या मुसक्या आवळल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी खुलताबाद पोलिसांना १० हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे मँनेजर अशोक गोपीनाथ काकडे हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शनिवार व रविवारची पेट्रोल पंपांचे जमा झालेले ५ लाख ३७ हजार रूपये बँकेत जमा करण्यासाठी मोटारसायकलवर जात होते. वेरूळ येथील उड्डाण पुलाखाली काही जणांनी मँनेजर काकडे यांना अडवून प्राणघातक हल्ला करीत त्यांच्याजवळील ५ लाख ३७ हजार रुपयांची बँग हिसकावून घेवून मोटारसायकलवरून पलायन केले. दरम्यान, पेट्रोल पंपांचे मालक विजय आसाराम बोडखे यांनी या संदर्भात खुलताबाद पोलीसात फिर्याद दिली होती. पोलीसांनी कलम ३९४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांना महत्वाची माहिती हाती लागली. पेट्रोल पंपावरील कामावरून कमी केलेला प्रकाश कल्याण चुंगडे ( २१, रा. खापरखेडा ता. कन्नड ) याच्यावर संशयाची सुई फिरत होती. पोलीस निरीक्षक मेहत्रे यांनी प्रकाशची इत्यंभूत माहिती घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे महत्वाची माहिती गोळा केली. यानंतर पोलिसांनी तत्काळ प्रकाश कल्याण चुंगडे , महेंद्र रामदास सांळुके ( २१, रा. मजूर ता. वैजापूर) , नितीन घाशीराम राजपूत ( रा. खापरखेडा) , अर्जून मिठ्ठू ताटू ( रा. रूपवाडी ता. कन्नड ) यांना बुधवारी ( दिं. २१ ) ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत संशयितांनी आणखी एकाच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपींकडून रोख रक्कम ३ लाख ११ हजार ६७० तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी किंमत ( ६० हजार) , तीन मोबाईल किंमत १५००० रूपये असा एकूण ३ लाख ८६ हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींना न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, पोहेकॉ नवनाथ कोल्हे, यतीन कुलकर्णी, भगवान चरावंडे, के. के. गवळी, सुहास डबीर, कृष्णा शिंदे, रूपाली सोनवणे, रामदास दिवेकर, प्रमोद गरड यांनी केली आहे.