नक्षत्रवाडीत दरोडेखोरांचा धुमाकुळ; वृद्ग दांपत्याला बेदम मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 02:27 PM2018-12-05T14:27:46+5:302018-12-05T14:29:48+5:30
पोलीस पाठलागावर असल्याचे पाहून पळून जाणाऱ्या दरोडेखोराच्या दुचाकीला अपघात झाला, मात्र आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले.
औरंगाबाद - पैठण रस्त्यावरील नक्षत्रवाडी भागातील एका घरात आज (ता. ५) पहाटे दुचाकीवरुन आलेल्या सात सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. साखर झोपेत असलेलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या घराचे दार तोडून मारहाण करत त्यांच्या १० वर्षांच्या नातवाच्या गळ्याला गुप्ती लावून दरोडेखोरांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिन्यांसह ५ हजाराचा माल लुटला.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दरोडेखोरांचा शोध सुरू केला. पोलीस पाठलागावर असल्याचे पाहून पळून जाणाऱ्या दरोडेखोराच्या दुचाकीला अपघात झाला, मात्र आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले.
भूजल सर्वेक्षण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी शांतीलाल पागोरे (६८) त्यांची पत्नी अनुसयाबाई पागोरे (५८) अशी जखमी दांपत्याचे नाव आहे .पागोरे हे त्यांच्या दहा वर्षांच्या नातवासह समोरच्या हॉलमध्ये झोपले होते. तर त्यांची मुले इतर खोल्यांमध्ये झोपलेली होती. आज पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. काही कळण्याच्या आत दरोडेखोरांपैकी एकाने मुलाच्या गळ्याला धारदार गुप्ती लावली आणि अन्य आरोपीनी पागोरे व त्यांच्या पत्नीचे तोंड दाबून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील कपाट व इतर ठिकाणी काय ठेवले आहे याची झाडाझडती घेतली.
आरडाओरड केल्यास नातवाला ठार मारू अशी धमकी दरोडेखोरांनी दिली होती. त्यामुळे घाबरून अनुसयाबाई शांत होत्या, मात्र दरोडेखोर नातवाला काही करतील म्हणून पागोरे यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांचे दगडी गोट्याने तोंड दाबून बेदम मारहाण केली. नातवाला मारण्याची धमकावत पाच हजार रुपयांचा ऐवज व सोन्याचे दागिने लुटून नेले.