औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; कमाई पाहून डोळे विस्फारले,मनपा कर्मचाऱ्यांचेही पाण्याचे टँकर आले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:18 PM2022-04-13T19:18:48+5:302022-04-13T19:19:24+5:30

टँकर लॉबीकडून कशा पद्धतीने पाणी पळविले जात आहे, याचा ‘लोकमत’ने खोलात जाऊन शोध घेतला असता या ‘कुटिल’ उद्योगात मनपाचे काही कंत्राटी कर्मचारीही गुंतल्याचे समोर आले.

robbery on Water in Aurangabad; Eyes widened after knowing earnings, water tankers of Aurangabad Municipal Corporation employees also came! | औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; कमाई पाहून डोळे विस्फारले,मनपा कर्मचाऱ्यांचेही पाण्याचे टँकर आले!

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; कमाई पाहून डोळे विस्फारले,मनपा कर्मचाऱ्यांचेही पाण्याचे टँकर आले!

googlenewsNext

- मुजीब देवणीकर
औरंगाबाद :
महापालिकेच्या टँकर घोटाळ्यात रोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. टँकरच्या पाण्यावर दररोज होणारी कमाई पाहून अनेक मनपा कर्मचाऱ्यांचे डोळे विस्फारले. त्यांनीही या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. कंत्राटदारांच्या ८० टँकरमध्ये सुपरवायझर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले टँकर लावले आहेत. कोटला कॉलनीत पाण्याच्या टाकीवर मागील ७ वर्षांपासून दोन हजार लीटरचा एक खासगी टँकर दररोज २५ फेऱ्या मारतोय. त्याला थांबविण्याची हिंमत आजपर्यंत कोणीच दाखवू शकले नाही, असा टँकर लॉबीचा दावा आहे.

शहरात नागरिकांना समाधानकारक पाणी मिळत नाही. सिडको-हडकोसह जुन्या शहरात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. औरंगाबादकरांच्या हक्काचे पाणी कोण पळवून नेते, याचा शोध ‘लोकमत’ने घेण्यास सुरुवात केली. १० एप्रिलपासून ‘पाण्यावर दरोडा’ या वृत्त मालिकेत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. पाण्यावर दरोडा पडतोय, हे मनपा प्रशासनाने मान्य केले. कंत्राटदाराला अभय देत टँकरच्या माध्यमातून होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी उपाययोजनाही करण्याचे प्रशासनाने जाहीर केले.

टँकर लॉबीकडून कशा पद्धतीने पाणी पळविले जात आहे, याचा ‘लोकमत’ने खोलात जाऊन शोध घेतला असता या ‘कुटिल’ उद्योगात मनपाचे काही कंत्राटी कर्मचारीही गुंतल्याचे समोर आले. कोटला पाण्याच्या टाकीवर एमएच-१२- जीटी-५७८२ हा टँकर मागील ७ वर्षांपासून पाणी भरतोय. रोज किमान २५ फेऱ्या तो मारतो. त्याला कोणीही काहीही बोलू शकत नाही. याचे पाणी बंद होऊच शकत नाही, असा दावा सूत्रांनी केला. ५० हजार लीटर पाणी चोरणारा कोण, त्यावर कोणाचा वरदहस्त, हे सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. जेथे टँकर भरले जातात, तेथे हे प्रकार नवीन नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मनपा कर्मचाऱ्यांचे टँकर
कोटला पाण्याच्या टाकीवर एमएच-१८-एम-६५८५ हा टँकर मनपाच्या सुपेकर या कर्मचाऱ्याने लावला आहे. एन-५ येथील टाकीवरही सुपरवायझर पंकज उदावंत यांनी टँकर एमएच-२०- सीआर- ३५०२, सुपरवायझर ज्योतीराम पाटील यांनी एमएच-२०-एवाय-२७३५ हा टँकर लावला आहे. हे टँकर कितीदा आले अन् कितीदा गेले, हे कोणीही विचारू शकत नाही. सुपरवायझर एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांची राजकीय दहशत वेगळीच आहे.

Web Title: robbery on Water in Aurangabad; Eyes widened after knowing earnings, water tankers of Aurangabad Municipal Corporation employees also came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.