पोलिसांच्या वेशात दरोडा
By Admin | Published: May 15, 2016 12:03 AM2016-05-15T00:03:16+5:302016-05-15T00:07:01+5:30
औरंगाबाद : सोन्यावर कर्ज देणाऱ्या मुथुट फायनान्समध्ये भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडा घालण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद : सोन्यावर कर्ज देणाऱ्या मुथुट फायनान्समध्ये भरदिवसा शस्त्रधारी सहा दरोडेखोरांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, दरोडेखोरांमधील एक जण पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात होता. फायनान्स कार्यालयातील महिलांनी वेळीच दाखविलेल्या हुशारीमुळे लोकांची गर्दी जमली आणि दरोडेखोरांनी कारमधून पलायन केले. अमरप्रीत चौकातील शासकीय दूध डेअरीसमोरील मुथुट फायनान्समध्ये शनिवारी सकाळी ९.४० वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दरोडेखोरांच्या कारचा क्रमांक मिळविला. एमएच-२० बीसी-१३५७ असा क्रमांक असल्याचे समोर आल्यावर आरटीओकडे त्या क्रमांकाची तपासणी केली.
कारचा क्रमांक बनावट
मात्र, सदरील क्रमांक हा पाथर्डी तालुक्यातील भाऊसाहेब राजळे यांच्या नावाचा असल्याचे उघड झाले, असे पोलीस निरीक्षक प्रकाश डुकरे पाटील यांनी सांगितले.
याबाबत अधिक चौकशी केली असता ती कार पाथर्डी तालुक्यातच असल्याचे समोर आले.
भरदिवसा दरोड्याने खळबळ
मुथुट फायनान्समध्ये सिनेस्टाईल घडलेल्या या दरोड्यामुळे जिल्हाभर एकच खळबळ उडाली असून, अख्खे पोलीस दल हादरले आहे.
या प्रकरणी व्यवस्थापक रिना रेजी तोमस यांच्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी सर्वत्र नाकाबंदी केली असून, टोलनाक्यांवरही तशा सूचना दिल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पोलीस आयुक्त सुटीवरून परतल्यानंतर त्यांना दरोडेखोरांनी तगडे आव्हान दिले आहे.
याबाबत उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, हॉटेल अमरप्रीत चौकात जालना रोडवर मुथुट फिनकॉर्पचे कार्यालय आहे. सकाळी ९ वाजता व्यवस्थापक रिना रेजी, हिमा बाबू आणि व्ही.जी. गिव्हरगीस यांनी कार्यालय उघडले. या कार्यालयात तीन महिला काम सांभाळतात. अंदाजे ९.४० वाजता अमरप्रीत चौकाकडून गोल्डन कलरची कार (क्र. एमएच-२० बीसी-१३५७) आली. याचवेळी दूध डेअरीसमोर थांबलेले दोघे जालना रोड ओलांडून फायनान्स कार्यालयाकडे आले. कारमधून प्रथम पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात असलेला दरोडेखोर खाली उतरला. त्याच्यासोबत इतर चौघे कार्यालयात घुसले. पोलिसाच्या गणवेशात असलेला दरोडेखोर व्यवस्थापक रिना रेजी यांच्या केबिनमध्ये घुसला.
त्याने सोन्यावर कर्ज घेण्याची प्रक्रिया विचारली. त्याला प्रक्रिया सांगितल्यानंतर त्याने एक पुरुषाचा आणि दोन महिलांचे फोटो दाखविले.
या लोकांनी तुमच्याकडे चोरीचे सोने ठेवले आहे, असे सांगून सहा महिन्यांचा डीव्हीआर मागितला. त्यावर त्यांना डीव्हीआर पाहता येणार नाही, असे व्यवस्थापकाने सांगून ओळखपत्र विचारले.
त्याचवेळी त्याने डीव्हीआर कुठे आहे, असे धमकावून विचारले आणि कानशिलात लगावली. तेव्हा इतर दरोडेखोर स्ट्राँग रूमकडे जात होते. हे पोलीस नाहीत, असे लक्षात येताच व्यवस्थापक महिलेने हिमा बाबू हिला मल्याळम भाषेतून अलार्म वाजविण्यास सांगितले. हिमाने अलार्म वाजविला. तेव्हा एक ग्राहक मुख्य दरवाजावर आलेला होता. त्याच्याकडे दरोडेखोरांची नजर गेली. तेवढ्यात व्यवस्थापक महिलेने दोघांना ढकलून देत बाहेर येऊन आरडाओरड केली.
त्यानंतर दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हर दाखवून महिलांना धमकावले आणि आत ओढून नेले. तोपर्यंत बाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती. हा प्रकार अंगलट येईल, असे वाटल्यामुळे दरोडेखोरांनी एक सीपीयू, नेटचे आऊटर घेऊन कारमधून क्रांतीचौकाकडे पोबारा केला. त्यानंतर ही माहिती पोलिसांना सांगण्यात आली.
घटनास्थळावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलीस निरीक्षक प्रकाश डुकरे पाटील, अविनाश आघाव, सहायक पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे, फौजदार अमोल देशमुख यांच्यासह शेकडो पोलीस आले होते.
कारचा रंग ओळखण्यासाठी खटाटोप
पोलिसांनी शेजारी सर्व्हिस सेंटरसह आजूबाजूच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून कारचा क्रमांक मिळविला.
मात्र, कारचा रंग ओळखण्यासाठी त्यांना चांगलाच खटाटोप करावा लागला. गोल्डन कलरची कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नेमकी कशी दिसते हे पाहण्यासाठी पोलिसांनी जालना रोडवरून जाणाऱ्या तशा रंगाच्या एका कारला अडविले.
एवढ्या मोठ्या फौजफाट्याने अडविल्यामुळे कारचालकास काय घडत आहे, हे समजलेच नाही. त्याला जेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केवळ कारचा रंग कसा दिसतो हे पाहायचे आहे, असे सांगितल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.