निवृत्त प्राचार्याचा बंगला फोडून तासाभरातच पळवले ३५ तोळयाचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 03:38 PM2018-11-01T15:38:39+5:302018-11-01T16:05:26+5:30
निवृत्त प्राचार्याचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी ३५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये चोरून नेली.
औरंगाबाद: उच्च शिक्षितांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदनवन कॉलनी येथील रहिवासी निवृत्त प्राचार्याचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी ३५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये चोरून नेली. हा प्रकार बुधवारी रात्री सहा ते सात वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी छावणी ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, नंदनवन कॉलनीतील रहिवासी प्राचार्य राजगोपाल सुरवसे हे जळगाव येथील एका महाविद्यालयातून प्राचार्यपदावरून निवृत्त झाले आहेत. नंदनवन कॉलनीत त्यांचा बंगला असून तेथे ते पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा लातूर येथील शासकीय वैदयकीय महाविद्यालयात वैद्यकीय शाखेत एम.डी.चे शिक्षण घेत आहे. तर मुलगी आणि जावई जालाननगर येथे राहतात. मुलगी शिल्पा एमआयटी कॉलेजमध्ये अधिव्याख्याता तर जावई सार्वजनिक बांधकाम विभागात आर्किटेक्ट आहेत. मुलीची दहा वर्षीय मुलगी पैठण रस्त्यावरील अग्रेसन शाळेत चौथीमध्ये शिकत आहे. नातीच्या शाळेत बुधवारी सायंकाळी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रा. सुरवसे दाम्पत्य आणि मुलगी शिल्पासह बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कार घेऊन गेले होते.
शाळेत जाताना त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या समोरच्या हॉलचा दरवाजा लॅच लावून बंद केला होता. शिवाय बाहेरून कडीकोंडाही लावून ते मुख्य लोखंडी गेटला कुलूूप लावून गेले होते. चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडले त्यानंतर मुख्य दरवाजाचे लॅच तोडून बंगल्यात प्रवेश केला. आत गेल्यानंतर लोखंडी कपाट उचकटून त्यातील सुमारे ३५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये चोरून नेले. सात वाजेच्या सुमारास सुरवसे दाम्पत्य घरी परतल्यानंतर त्यांना चोरीची घटना दिसली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.